Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक बनावट मुद्रांक प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार, परवाना निलंबित

बनावट मुद्रांक प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार, परवाना निलंबित

परवाना निलंबित; मुद्रांक साठा, नोंदवह्या व मूळ परवाना जप्तीचे आदेश

Related Story

- Advertisement -

बनावट मुद्रांक बनवून खोटे दस्तावेज तयार करून शेतजमीन खरेदी प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ हा फरार असून, त्याचा मुद्रांक परवाना निलंबित करण्यात आला आहे. वाघकडे असलेला मुद्रांक साठा, नोंदवह्या व मूळ परवाना जप्तीचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी देवळ्याच्या दुय्यम निबंधकांना दिले आहेत.

देवळा येथे एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक आढळून आल्यानंतर या प्रकरणाची तत्काळ त्रिसदस्यीय पथकाद्वारे चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. मुद्रांक विक्रेता गोटू वाघ याने बनावट मुद्रांक बनवून खोटे दस्तावेज तयार करून शेतजमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार देवळा पोलिसांनी मुद्रांक विक्रेता गोटू देवाजी वाघ (रा. गिरणारे, ता. देवळा) व फेरफार नोंद करून जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापू रामचंद्र वाघ (रा. झाडी ता. मालेगाव) व इतर साथीदारांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, दोघेही प्रमुख संशयित आरोपी फरार असून, देवळा पोलिसांना अद्याप त्यांना अटक करण्यात यश आलेले नाही.

- Advertisement -

या संपूर्ण प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला मुद्रांक विक्रेता चंद्रकांत वाघ याचा मुद्रांक विक्रीचा परवाना १३ फेब्रुवारीपासून या गुन्ह्यातील न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत निलंबित केला आहे. तसेच, त्याच्याकडील मुद्रांक साठा, नोंदवह्या व मूळ परवाना जप्त करण्याचे आदेशही देवळा दुय्यम निबंधकांना दिले आहेत.

- Advertisement -