घरमहाराष्ट्रनाशिकरेशन दुकानात धान्य उपलब्ध, वितरण मात्र बंद; ही आहे तांत्रिक अडचण

रेशन दुकानात धान्य उपलब्ध, वितरण मात्र बंद; ही आहे तांत्रिक अडचण

Subscribe

नाशिक : रेशन दुकानातील पॉस मशिन सर्व्हर डाउनमुळे बंद असून यामुळे रेशनवरील धान्याचा पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद झाला आहे. ई-पॉस मशिनअभावी लाभार्थ्यांनाही वंचित राहावे लागत असून रेशन दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये खटके उडत आहेत. त्यामुळे पॉस मशिनच्या तांत्रिक बिघाड तातडीने दुरूस्त करून पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नाशिक जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.
राज्यात रेशन दुकानातून धान्य वितरणासाठी ई-पॉस या बायोमॅट्रीक प्रणालीचा वापर केला जातो. धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जात असला तरी, अनेकदा सर्व्हर डाऊनमुळे धान्य उपलब्ध असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

सततच्या या समस्येमुळे रेशन दुकानदारही त्रस्त झाले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या आठवडयात धान्य घेण्यासाठी रेशन दुकानात लाभार्थ्यांची गर्दी होत असते. परंतु नेटवर्क नसल्याने धान्य वितरणाचे कामच ठप्प झाल्याने वादाचे प्रसंगही निर्माण होत आहेत. ई-पॉसचा वापर सुरू झाला तेव्हा टू-जी इंटरनेट वापरले जात होते. त्यामुळे ई-पॉस मशीनमध्ये टू-जी यंत्रणेचा वापर केला होता. २०२० पर्यंत या मशीन व्यवस्थित सुरू होत्या. मात्र आता फोर-जी यंत्रणेचा वापर सुरू झाला असून, लवकरच फाईव्ह-जीचा वापरदेखील केला जाणार आहे.त्यामुळे दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट करावे अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून धान्य वितरणच बंद असल्याने ही मुदत वाढवून देण्याची मागणीही पुरवठा अधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, फारुख हुसेन शेख, योगेश बत्ताशे, दिलीप नवले, मारूती बनसोडे, चेतन घोलप उपस्थित होते.

- Advertisement -

दुकानदारांना मनस्ताप

रेशन दुकानांमधील ई-पॉस मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे न घेता येणे, नेटवर्क कमी येणे, मशीन बंद होणे या कारणांमुळे धान्य देता येत नाही. या सर्व प्रकारामुळे दुकानदारांसोबतच ग्राहकही वैतागले आहेत. वेळेवर धान्य मिळत नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जातो. तर काहीजण धान्य दुकानदारांशी वाद घालत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -