घरमहाराष्ट्रनाशिकशहरात शनिवारपासून हेल्मेटसक्ती सोबतच समुपदेशनही

शहरात शनिवारपासून हेल्मेटसक्ती सोबतच समुपदेशनही

Subscribe

वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार

नाशिक : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेणे अपघात रोखण्यासाठी हेल्मेट जनजागृतीसाठी अनोख्या प्रकारच्या मोहिमा राबवूनही बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागत नसल्याने पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवार पासून शहरात समुपदेशनासह हेल्मेटसक्ती केली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

नाशिक शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दंडात्मक कारवाई न करता अनोखी मोहीम राबवली. त्यास नाशिककरांनी प्रतिसाद दिला. शहरात पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी नो हेल्मेट, दोन तास समुपदेशन, नो हेल्मेट, नो पेट्रोल, नो हेल्मेट, शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी या मोहिमा राबविल्या. या वेगवेगळ्या मोहिमांमधून बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यात आली.

- Advertisement -

वाहनचालकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले. पेट्रोलपंपावर विनाहेल्मेट दुचाकीचालकांना पेट्रोल देण्यास नकार देण्यात आल्याने वादाचे प्रसंगसुद्धा घडले. परिणामी, ७० टक्क्यांहून अधिक वाहनचालक हेल्मेट वापरु लागल्याने शहरातील अपघात आटोक्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तरीही, शहरातील बेशिस्त वाहनचालक विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मंगळवारी गंगापूर रोडवर भरधाव दुचाकीच्या अपघातात विनाहेल्मेट दोन तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या अपघातानंतर पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शहरात शनिवारपासून शहरात हेल्मेटसक्ती केली आहे.

पेट्रोलपंपचालकांवर दाखल होणार गुन्हा

नाशिक शहरातील ७० पेट्रोलपंपावर विनाहेल्मेट दुचाकीचालकांना पेट्रोल देवू नये, यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय नवीन आदेश काढणार आहेत. त्यानुसारपेट्रोल चालक व मालकांना हेल्मेट परिधान केलेल्या वाहनचालकास पेट्रोल देणे बंधनकारक राहणार आहे. विनाहेल्मेट वाहनचालकास पेट्रोल दिल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस संबंधित पेट्रोलपंपचालक व मालकावर आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करणार आहेत. पेट्रोलपंपावर वारंवार विनाहेल्मेट वाहनचालकांना पेट्रोल दिल्याचे निदर्शनास आल्यास पेट्रोलपंप धोकादायक झाला आहे, असे गृहीत धरुन पेट्रोलपंप बंद करण्यात का येऊ नये, अशी नोटीस दिली जाणार असल्याचं पोलीस आयुक्त पाण्डेय म्हणाले.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -