घरमहाराष्ट्रनाशिकआंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, नाशिकचे नाव जगात व्हावे

आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, नाशिकचे नाव जगात व्हावे

Subscribe

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी क्रीडा क्षेत्राविषयी काढले गौरवोद्गार

नवीन नाशिक :  नाशिक ही अमृताच्या थेंबांनी पवित्र झालेली महाकुंभाची भूमी आहे. या भूमीतून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अधिक खेळाडू तयार व्हावेत आणि त्यांच्या कर्तृत्वाने नाशिकचेच नव्हे तर देशाचे नाव जगात उज्ज्वल व्हावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. द एसएसके वर्ल्ड क्लबच्या वतीने आयोजित यशोकीर्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, एसएसके वर्ल्डचे संचालक शैलेश कुटे व राजश्री कुटे उपस्थित होते.

इच्छा असेल तर मार्ग निघतो असे सांगत, नाशिकमध्ये तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या क्रीडासंकुलाप्रमाणे इतर राज्यांतही अशी सर्व सुविधांयुक्त क्रीडासंकुले तयार होण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. अशा क्रीडासंकुलांचा फायदा खेळाडूंनी घेतला तर देशाच्या सर्व भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडतील, असा विश्वासही कोश्यारी यांनी व्यक्त केला. यावेळी कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक दिल्याची आठवण करून दिली.

- Advertisement -

राज्यपालांच्या भाषणापूर्वी माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन शैक्षणिक व क्रीडा धोरणांमुळे या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत असून त्याचे सुपरिणाम आता दिसू लागल्याचे सांगितले. तर अन्न व नागरी पुरवठा तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडच्या काळात नाशिकची सर्वच क्षेत्रातील प्रगती ही खर्‍या अर्थाने कौतुकाचा विषय असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकारने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद केली असून तालुका स्तरावरील क्रीडा संकुलासाठी पाच कोटी,जिल्ह्यासाठी २५ कोटी तर विभागासाठी ५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले.

द एसएसके वर्ल्ड क्लबच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील विविध क्रीडाप्रकारांमध्ये उत्तुंग कामगिरी करणार्‍या तसेच अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना राज्यपालांच्या हस्ते यशोकीर्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पाथर्डी व गौळाणे परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -