घरमहाराष्ट्रनाशिकदारणा धरणाची सुरक्षितता वार्‍यावर

दारणा धरणाची सुरक्षितता वार्‍यावर

Subscribe

सूचना करून वर्ष उलटले, अद्याप उपाययोजनांच्या पूर्ततेला मुहूर्त लाभेना, जिल्हा प्रशासनाला सुधारित अहवालाची प्रतिक्षा

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याच्या घटनेनंतर सर्वाधिक धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमधील धरणांच्या सुऱक्षिततेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे धरण सुरक्षितता संघटनेने जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या अहवालानुसार शंभर वर्षांपूर्वीच्या ब्रिटीशकालीन दारणा धरणाच्या दुरुस्तीची सूचना केली आहे. मात्र, वर्ष उलटूनही याबाबत कोणत्याही उपाययोजना सुरू झाल्या नसल्याचे चित्र आहे.

उत्तर महाराष्ट्रातील लहान-मोठ्या धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जलसंपदा विभाग, धरण सुरक्षितता संघटना यांच्याकडून वर्षातून दोन वेळा धरणांची पाहणी करुन, तसा अहवाल तयार केला जातो. त्यात आढळलेल्या त्रुटींनुसार त्याची तीव्रता लक्षात घेत वर्गवारीनुसार उपाययोजना सूचविल्या जातात. २०१७-१८ मधील या अहवालानुसार क्लास वनमधील दारणा धरणाच्या पाहणीत वर्ग-२ मधील काहीअंशी असुरक्षित अशा त्रुटी आढळून आल्या आहेत. हे धरण १०० वर्षांपूर्वीचे असल्याने, त्याच्या बळकटीकरणासोबतच त्याचे आधार असलेल्या ठिकाणी उपायोजना सूचविण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

नव्या अहवालाची प्रतिक्षा

धरण सुरक्षितता संघटनेने जिल्हा प्रशासनाला २०१७-१८ चा अहवाल सादर केला असून, त्यातील त्रुटींची पूर्तता अद्याप झाली किंवा नाही, याबाबत अधिकारीदेखील संभ्रमात आहेत. यानिमित्ताने शासकीय कार्यालयांमधील असमन्वयदेखील अधोरेखित झाला आहे.

सुधारित आराखड्यानुसार काम सुरू

दारणा धरण १०० वर्षांपूर्वीचे असल्याने त्याच्या सुरक्षेबाबत आम्ही अधिक काळजी घेत असतो. वर्षातून दोन वेळा सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक पाहणी केली जाते. त्रुटींच्या दुरुस्तीसाठी सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, त्यावर काम सुरू आहे. सुधारित अहवाल पावसाळ्यानंतर सादर होईल. – राजेंद्र मोरे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग

- Advertisement -

अप्राप्त अहवालाबाबत पत्राद्वारे खंत

धरण सुरक्षितता संघटनेने गेल्या वर्षी जो अहवाल सादर केला होता, त्यातच क्षेत्रीय कार्यालयांकडून पावसाळा पूर्व धरण तपासणी अहवाल आणि पावसाळ्यानंतरचा धरण तपासणी प्राप्त झाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील वर्ग १ च्या ५८ धरणांचे आणि वर्ग २ च्या १८१ धरणांचे पावसाळापूर्व, तसेच वर्ग १ च्या ६१ धरणांचे व वर्ग २ च्या २२३ धरणांचे पावसाळ्यानंतरचे तपासणी अहवालच प्राप्त झाले नसल्याची तक्रारही या पत्राद्वारे केली आहे. या पत्राद्वारे शासकीय कार्यालयांमधील कारभारही उघड झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -