घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रठेकेदारांच्या हितासाठीच गंगापूर धरणात चर खोदण्याचा अटटाहास ?

ठेकेदारांच्या हितासाठीच गंगापूर धरणात चर खोदण्याचा अटटाहास ?

Subscribe

माजी महापौर दशरथ पाटील यांचा आरोप

नाशिक : जून महिना संपत आला असून अद्यापही मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे शहरवासियांवर पाणी टंचाईचे संकट ओढावू शकते. पाऊस लांबल्याने गंगापूर धरणातील पाणी पातळीही घटली आहे. जर पाणी पातळी आणखी घटल्यास जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्याचा विषय पुढे आला. या विषयाला माजी महापौर दशरथ पाटील यांनी हरकत घेतली असून अगोदर चर खोदलेली असतांना केवळ ठेकेदार हितासाठी ही उधळपटटी का असा सवाल करत पाटील यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.

अल निनो आणि बिपरजॉय वादळामुळे मान्सून लांबल्याचे हवामान विभागाकडे सांगितले जाते. त्यामुळे धरणाची पाणी पातळीही दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापुर धरणात आजमितीस अवघा ३१ टक्के तर धरण समुहात २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरणाची पाणी पातळी ५९८ मीटरच्या खाली गेल्यास जॅकवेल आणि मुख्य प्रवाहात खडक असल्यामुळे पाणी आणण्यात अडचण येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे जॅकवेल पर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्याचा विषय महासभेपुढे ठेवण्यात आला. ५ कोटी ५० लाख रूपयांचा हा प्रस्ताव असून प्रभारी आयुक्तांनी तुर्तास हा विषय बाजूला ठेवला आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर, माजी महापौर दशरथ पाटील यांनी आयुक्तांना धरणातील प्रत्यक्षातील स्थिती छायाचित्राद्वारे मांडून निवेदन दिले आहे. शहराला गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. धरणात जॅकवेल असून तिथे पाणी येण्यासाठी खोलवर चरही खोदलेला आहे. चार वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारे चर खोदण्याच्या नावाखाली उधळपट्टीचा डाव आखला गेला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तेव्हा आपण खोदलेल्या चराचे छायाचित्र पाठवून तत्कालीन आयुक्तांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर चर खोदण्याचा विषय मागे पडला होता. आता पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पुन्हा यात ठेकेदारांची टोळी सक्रिय झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी पाटील यांनी केली. आवश्यकता भासल्यास महापालिकेची स्वत:ची यंत्रणा वापरून गाळ काढण्याचा पर्याय निवडावा, चार वर्षांपूर्वीही अशी सूचना मांडलेली होती, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -