ऑनलाईनचा नियम फक्त झेडपीच्या सभांनाच

सप्तश्रृंग गडावर प्रशासनाची ऑफलाईन बैठक; नियमांमधील दुटप्पीपणा उघड

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसह विषय समितीच्या सभाही ऑनलाईन घेण्याचे आदेश देणार्‍या प्रशासनाने स्वत:च या आदेशाची पायमल्ली केल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने गुरुवारी (दि.१३) सप्तश्रृंग गडावर सांडपाणी व्यवस्थापन व प्लॅस्टिक व्यवस्थापनाबाबत बैठक घेतली. मग फक्त जिल्हा परिषदेच्याच सभा ऑनलाईन घेण्याचे नियम आहे का? असा प्रश्न उपस्थित करत सदस्यांनी प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी गडावर बैठक घेतली. राज्य शासनाच्या ८ जानेवारीच्या आदेशात स्पष्टपणे शासकीय बैठका ऑनलाईन घ्याव्यात असे नमूद केले आहे. त्यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांच्या ६ जानेवारीच्या आदेशातही तशा सूचना दिल्या असताना जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख सप्तश्रृंग गडावर जाऊन घनकचरा व्यवस्थापनाची बैठक घेतात, यामुळे कोरोना बाबतचे प्रतिबंधात्मक निर्णय यांना लागू नाहीत का, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे.

या बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्वला बावके, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे दीपक चाटे यांच्यासह गटविकास अधिकारी नीलेश पाटील, सरपंच रमेश पवार, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, रोपवेचे राजीव लुंभा, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, ग्रामसेवक संजय देवरे आदी उपस्थित होते.

बैठकीला अधिक लोक उपस्थित नव्हते. तेथे जाऊन आम्ही ऑनलाईन बैठक घेतली आहे.
– आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक