घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपवारांची नाराजी पवारांच्या ‘प्रगती’ला भोवली

पवारांची नाराजी पवारांच्या ‘प्रगती’ला भोवली

Subscribe

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच माजी सरचिटणीस नीलिमा पवारांनी शरद पवार यांची थेट नाराजी ओढवून घेतली. या प्रकरणामुळे विरोधकांना आयते कोलित मिळाले आणि निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत नाराज गटाला ‘गुप्तपणे’ जोडून घेत ‘परिवर्तन’ घडवण्यात अ‍ॅड.नितीन ठाकरे गटाला यश मिळाले. राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून ‘मविप्र’चा नावलौकिक आहे. जिल्ह्यातील 10 हजार मतदारांचा कौल दर पाच वर्षांनी घेतला जातो. 2022 च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच सत्ताधारी गटाने शरद पवारांची नाराजी ओढवून घेतली.

ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांना सरचिटणीसपदाची उमेदवारी नाकारल्यानंतर शरद पवार तर नाराज झालेच शिवाय शेटे यांचे समर्थकही दुखावले. ऐवढे होऊनही श्रीराम शेटे अखेरपर्यंत ‘प्रगती’च्या व्यासपीठावर उभे राहिले. पण कार्यकर्त्यांची फौज ‘परिवर्तन’कडे वळली होती. हा यंदाच्या निवडणुकीतील पहिला फॅक्टर ठरला. तर दुसरे म्हणजे पॅनलची घोषणा अगदी अखेरच्या क्षणी करणे. एका जागेसाठी दोन किंवा तीन उमेदवारांना ‘वेटींग’वर ठेवण्याची पध्दत यंदाही प्रगतीने कायम ठेवली.  उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या नेत्यांनी विरोधकांना ‘आतून’ मदत केली. त्यामुळे मतदारांमध्ये ‘अंडरकरंट’ तयार झाला. निवडणुकीचे वातावरण प्रगतीला पोषक असे तयार झाले. पण आतमध्ये वेगळेच काही घडत गेले. त्याचा थांगपत्ताच प्रगतीच्या उमेदवारांना लागला नाही. निफाडकरांनी प्रगतीला काही प्रमाणात साथ दिली.

- Advertisement -

पण चांदवड, दिंडोरी, मालेगाव व कळवण या चार तालुक्यांमध्ये ‘परिवर्तन’ला कौल मिळाल्याचे मतपेट्यांवरुन दिसून आले. मतपेट्या एकत्रिकरण करण्यासाठी उघडल्यानंतर याचा अंदाज बांधता आला. निवडणुकीच्या सुरुवातील निर्माण झालेली नाराजी जिल्ह्यातील नाराज नेत्यांनी कायम ठेवली. यात उमेदवारी नाकारलेले माजी अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, दिंडोरीचे दत्तात्रय पाटील यांच्या रुपाने मतमोजणीनंतर दिसून आली. दिंडोरीचा उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून आला, हे त्याचेच द्योतक आहे. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत नीलिमा पवारांचा पराभव होणे शक्यच नाही, अशी धारणा असलेल्या राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांचा अंदाज खोटा ठरवत परिवर्तनच्या शिलेदारांनी तब्बल 20 वर्षांनंतर सत्तातर घडवले. आता पुढील पाच वर्षात पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून मतदारांच्या आश्वासनांची पूर्ती करण्याचे आव्हान अ‍ॅड.नितीन ठाकरे यांच्यासमोर असेल. त्यावर कितपत यशस्वी ठरतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -