घरमहाराष्ट्रनाशिकउन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याचे दर वधारले

उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याचे दर वधारले

Subscribe

उत्पादकांना दिलासा

वणी :  दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजारात उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याचे दर वधारल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. कांदा लागवड ते उत्पादन या प्रक्रियेत येणारा खर्च व कांद्यास मिळणारे दर याबाबत सातत्याने असमानता राहिल्याने उत्पादकांचे आर्थिक गणित चुकते. परिणामी माल आहे तर भाव नाही भाव आहे तर माल नाही. अशा वेळी ज्यांचेकडे साठवणूक व्यवस्था आहे त्यांना याचा फायदा मात्र बोटावर मोजण्याइतके उत्पादक या पठडीतील आहेत. एरवी व्यापारी वर्गाला चढ-उताराचा अंदाज असल्याने त्यांचे तुलनात्मक गणित चुकत नाही. मात्र उत्पादकांना नेहमी या प्रणालीचा फटका बसतो हे वास्तव आहे.

दरम्यान, वणी उपबाजारात उन्हाळ व लाल कांद्याची आवक झाली. एकूण २२४ वाहनांतून उत्पादकांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यात ७० वाहनांमधून उन्हाळ कांदा तर १४४ वाहनांमधून लाल कांदा विक्रीसाठी आणण्यात आला होता. उन्हाळ कांद्याला प्रतवारी व दर्जा तपासून ११००  ते १७७० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला तर लाल कांद्याला १३५१  ते २१२१  रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला एकूण 4 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

- Advertisement -

दरम्यान, वणी उपबाजारात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. पैकी उन्हाळ कांदा अजुनही काही उत्पादकांकडे शिल्लक आहे. दिंडोरी, चांदवड, कळवण या तालुक्यातून उपबाजारात कांदा विक्री साठी उत्पादक आणतात. कांदा खरेदीनंतर रोख स्वरूपात रक्कम अदा करण्याच्या बाजार समितीच्या सूचना असल्याने याचे पालन करण्यास अग्रक्रम देण्यात येतो. त्यामुळे कांदा उत्पादक व व्यापारी यांच्यात समन्वयात्मक व्यवहार प्रणालीमुळे पारदर्शकता येत आहे. दरम्यान टोमॅटोचे दर कमालीचे घसरले आहेत. उत्पादन खर्च तर सोडाच खुडणी व वाहतुकीचाही खर्च निघणे मुश्कील झाले आहे. त्यात गत कालावधीत कांद्याचे दरही घसरले होते. मात्र आता लालकांद्याला उन्हाळ कांद्यापेक्षा अधिक दर मिळू लागल्याने उत्पादकांमधे काही अंशी अपेक्षित नसले तरी दिलासादायक वातावरण आहे.

उत्पादकांना दिलासा

लाल कांद्याची टिकवणक्षमता कमी असते त्यामुळे या प्रकारच्या कांदा साठवणुकीडे उत्पादक व व्यापारी या दोघांचाही कल कमी असतो. तसेच व्यापारी हा कांदा त्वरेने देशांतर्गत व्यापारी खरेदीदार यांना पाठवतात. दरम्यान उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला चढा दर मिळत असल्याने उत्पादकांना दिलासा देणारी ही बाब आहे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -