ज्येष्ठ नेते भास्करराव बोरस्ते यांचे निधन

नाशिक : बँकिंग, शैक्षणिक, समाजकारण, राजकारण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते भास्करराव बोरस्ते यांचे बुधवारी (दि. ३१) सकाळी वृद्धापकाळाने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथे राहणारे भास्करराव बोरस्ते यांनी माध्यमिक शिक्षणानंतर बीवायके कॉलेज येथे पदवीचे शिक्षण घेतले. स्वतःच्या उदरनिर्वाहाचा भाग म्हणून त्यांनी प्रारंभी न्यू नाशिक प्रिंटिंग प्रेस सुरू केला. या प्रिंटिंग प्रेसचा विस्तार करून अशोक स्तंभ, मल्हार गेट पोलीस चौकी येथे स्वतंत्र प्रिंटिंग प्रेस सुरू करून अतिशय सचोटीने काम करून नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालत यश मिळवले.

]\राजकारणाची आवड असल्याने भास्करराव बोरस्ते यांनी तत्कालीन वॉर्ड 16 मधून सन 1974 मध्ये नाशिक नगरपालिकेची निवडणूक लढवली. डॉ. वसंतराव गुप्ते नगराध्यक्ष असताना त्यांनी उपनगराध्यक्षपद भूषवत आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांनी नगरसेवक मित्रांचा गट तयार केला. माजी खासदार डॉ. प्रताप वाघ यांची निवडणूक प्रामुख्याने भास्करराव बोरस्ते आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांच्या मदतीने विजयश्री खेचून आणला. नाशिक जिल्ह्यातील सर्वात जुनी असलेली नाशिक पीपल्स को-ऑप. बँक ही अतिशय अडचणीत आलेली असताना भास्करराव बोरस्ते व रमेश केंगे यांच्या नेतृत्वाखाली त्या बँकेवर प्रशासक मंडळ नेमण्यात आले. सुमारे 20 वर्ष ते या बँकेवर संचालक होते, काही वर्ष चेअरमनही राहिले. भास्करराव बोरस्ते यांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचे काम केले. त्यांची राजकीय परंपरा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अजय बोरस्ते हे 20 वर्षांपासून चालवत आहे. उपमहापौर, शिवसेना गटनेते, विरोधी पक्षनेता, शिवसेना महानगरप्रमुख पदे अजय बोरस्ते यांनी भूषवून ते राजकारणात सक्रिय आहेत. भास्करराव बोरस्ते हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांना तीन मुले असून काही वर्षांपूर्वी त्यांचे द्वितीय चिरंजीव अभय बोरस्ते यांचे देखील निधन झाले होते. वयाच्या 84 वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून बोरस्ते परिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, तीन सूना, तीन नातू, तीन नाती आहेत.

नाशिक अमरधाम येथे दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे भगीरथ शिंदे, चिंतामण सोनवणे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, आ. माणिक कोकाटे, आ. देवयानी फरांदे, आ. दिलीप बनकर, मविप्रचे अध्यक्ष सुनील ढिकले यांनी श्रद्धांजली अर्पण केली.