घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिद्धिविनायक नागरी पतसंस्थेचे पैसे थेट ऑनलाईन जुगारात

सिद्धिविनायक नागरी पतसंस्थेचे पैसे थेट ऑनलाईन जुगारात

Subscribe

नाशिक : ओझर येथील सिद्धिविनायक पतसंस्थेतील तीन कोटी रुपयांच्या अपहाराबाबत धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा पैसे संस्थेच्या बेजबाबदार कर्मचार्‍यांनी चक्क बिंगो रोलेटमध्ये उडविले असून संस्थेच्या खात्यातूनच हा पैसा वळविल्याची माहिती एका जबाबदार संचालकाने दिली आहे. पतसंस्थेतील कर्मचारी जर रोलेट बिंगोसारख्या ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेले असतील तर सर्वसामान्यांच्या पैशांची सुरक्षा काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.

सिद्धिविनायक पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रुपयांची अफरातफर झाल्याने खळबळ उडाली आहे. संस्थेतील एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्यानंतर हा पैसा कुठे आणि कसा वापरला गेला याची धक्कादायक माहिती ‘आपलं महानगर’च्या हाती आली आहे. या अपहार प्रकरणातील मुख्य संशयित लेखापालाने कायद्याची तमा न बाळगता संस्थेतील पैसा बिनदिक्कतपणे ‘रोलेट बिंगो’ या ऑनलाईन जुगारात उडविल्याचे स्पष्ट झाले आहे. रोलेट बिंगोमुळे अनेकांची संसार उघड्यावर पडले आहेत. तर अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. रोलेट बिंगोच्या आहारी जाणार्‍यांचे पोलिसांकडून नेहमीच समूपदेशन करण्यात येते. असे असतानाही सुशिक्षित वर्ग त्यातही पतसंस्थेतील जबाबदार लोक जर बिंगोच्या आहारी गेले असतील तर सर्वसामान्यांच्या पैशांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. बँक खात्यामध्ये पैसे टाकले की आपला पैसा सुरक्षित आहे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये असते. मात्र आपला पैसा सट्टेबाजांच्या हाती जातो आहे, याची पुसटशी कल्पनाही नागरिक करू शकत नाही.

- Advertisement -

धक्कादायक बाब म्हणजे, रोलेट बिंगो खेळण्यासाठी वापरला गेलेला पैसा हा थेट बँकेच्या खात्यातून वळता केला आहे. इतका स्पष्ट पुरावा असून देखील संस्थाचालक मात्र लेखापालाला पाठीशी घालत आहे. यातूनच संशय वाढत आहे. अपहारातील रकमेची तफावत भरून काढण्यासाठी संस्थाचालकांचे प्रयत्न सुरू असून शिपायांच्या नावावर ५ लाख रुपये तर कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या नावावर प्रत्येकी १० लाख रुपये सेवक कर्ज दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण २६ कर्मचार्‍यांच्या नावाने कर्ज काढण्यात आले आहे. दोन संचालकांनी सुमारे ५२ लाखांचा भरणा संस्थेत केला आहे. संस्थेतील अफरातफरीची सारवासारव करताना मुख्य संशयित जरी लेखापाल असला तरी संशयाची सुई संस्थाचालकांकडेही जात आहे. ज्यांच्या नावावर सेवक कर्ज दाखविण्यात आले आहे, ज्या संचालकांनी बँकेत पैसे भरले आहेत त्यांचाही रोलेट बिंगो प्रकरणाशी संबंध आहे का याचा कायदेशीर तपास करण्याची मागणी होत आहे. रोलेट बिंगो प्रकरणामुळे सिद्धिविनायक पतसंस्थेची इज्जत पुुरती वेशीवर टांगली गेली आहे. इतके स्पष्ट पुरावे असून देखील संस्थाचालकांकडून कायदेशीर कारवाईला दिरंगाई का होत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -