घरताज्या घडामोडीजिल्हा रुग्णालयातून कोरोना संशयित रुग्णाचे पलायन

जिल्हा रुग्णालयातून कोरोना संशयित रुग्णाचे पलायन

Subscribe

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध यंत्रणा अहोरात्र कठोर उपाययोजना करत असतानाच शुक्रवारी (दि.३) जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या १९ वर्षीय युवकाने पलायन केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन व पोलिसांची पळापळ झाली.

रुग्णालयीन सुत्रानुसार, वैजापूर (जि.औरंगाबाद) येथील १९ वर्षीय युवकास शुक्रवारी येवला येथून उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला सर्दी, खोकला व श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्याच्यावर कोरोना विलगीकरण कक्षात उपचार सुरु होते. शनिवारी दुपारी छातीचा एक्स रे काढण्यासाठी डॉक्टर त्याला नेत असताना तो नजर चुकवून पळून गेला. ही बाब जिल्हा रुग्णालय व पोलिसांना समजताच त्याची शोधाशोध सुरु केली. मात्र, तो सापडला नाही. सुदैवाने रुग्णालयातर्फे त्याच्या घशाचे नमुने शुक्रवारीच घेण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने रुग्णालयाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तथापि, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

रिपोर्टला संशयाची किनार ?

जिल्हा रुग्णालयात संशयित रुग्ण शुक्रवारी दाखल झाला व त्याचे रिपोर्ट शनिवारी निगेटिव्ह आले असताना दुसर्‍याच दिवशी डिस्चार्ज का दिला जाणार होता? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. प्रत्यक्षात रुग्णांना १४ दिवस निगराणीखाली ठेवले जाते. मात्र, त्याचे नमुनेच घेतले गेले नाहीत, अशीही उलटसुलट चर्चा सुरु आहे.

जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापन प्रभावी करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना सक्त ताकीद दिली आहे. यापुढे रुग्ण पळून गेल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध गंभीर कारवाई करण्यात येईल.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisement -

येवला येथील युवकाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याला शनिवारी संध्याकाळी डिस्चार्ज दिला जाणार होता. पण तो पळून गेला. कोरोना विलगीकरण कक्षाला गार्ड मिळण्याबाबत पोलीस अधिकार्‍यांना विनंती केली होती. ती विनंती त्यांनी मान्य केली आहे.
डॉ. निखिल सैंदाणे
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -