घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतहसीलदार नरेशकुमार बहिरम 'एसीबी'च्या जाळ्यात; १५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

तहसीलदार नरेशकुमार बहिरम ‘एसीबी’च्या जाळ्यात; १५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

Subscribe

नाशिक : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एक धडाकेबाज कारवाई करत मोठा मासा गळाला लावला आहे. नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांना तब्बल १५ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. जुने मुरूम उत्खननाचे प्रकरण पुन्हा एकदा चौकशीसाठी घेत या आधीच दंड झालेल्या तक्रारदाराकडून १५ लाखाची लाच स्वीकारताना बहिरम यांना अटक करण्यात आली आहे.

मागील काही महिन्यापासून नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या धडक कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. मात्र, तरीही नाशिक विभागातील लाचखोरांच्या खाबुगिरीला कुठेही आळा बसताना दिसून येत नाही. त्यातच अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिक तहसीलदार या पदावर कार्यरत असलेले नरेश कुमार बहिरम हे अधिकारी देखील लाचखोर असल्याचं समोर आला आहे. शनिवारी (दि. ५) बहिरम यांच्या कर्मयोगी नगर येथील निवासस्थानाच्या जवळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.

- Advertisement -

नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील एका जमिनीतून मुरूम उत्खननाचे प्रकरण समोर आले होते. त्याबाबत नियमानुसार पाचपट दंड आणि जागा मालकास जागा भाडे असे मिळून एकूण १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपये इतका दंड ठोठवण्यात आला होता. मात्र या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चौकशीसाठी तहसीलदार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. याबाबत जागेची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम हे राजुर बाहुला येथील तक्रारदारांच्या जमिनीवर गेले. त्या ठिकाणी त्यांनी या प्रकरणी तडजोड करण्यासाठी व त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी केली होती.

दरम्यान तक्रारदारांनी याबाबत नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर याबाबतची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचत तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांना त्यांच्या मेरिडियन गोल्ड या कर्मयोगी नगर येथील बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, सहसापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, यांच्यासह गणेश निंबाळकर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी कामगिरी बजावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -