स्पीडब्रेकरने घेतला चालकाचा बळी

स्पीडब्रेकरवरुन जात असताना तोल गेल्याने एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना आडगाव मेडिकल हॉस्पिटलच्या गेटसमोरील स्पीडब्रेकरवर घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मधुकर जगन्नाथ खोडे (वय ४४, रा.वडाळागाव, नाशिक) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मधुकर खोडे दुचाकीवरुन नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाकडून वडाळा गावाच्या दिशेने जात होते. ते आडगाव मेडिकल हॉस्पिटलच्या गेटसमोरील स्पीडब्रेकरवरुन जात होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला. त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारार्थ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.