जिल्ह्यातील टॉप 1500 कर्जदार ‘एनडीसीसी’च्या रडारवर

आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता जिल्ह्यातील 1500 बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. त्यांच्याकडून थकबाकी वसूलीसाठी बँकेने कंबर कसली असून, येत्या मार्चअखेर बँकेचा एनपीए कमी करुन बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्याचा निश्चय बँकेच्या प्रशासकांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.29) ऑनलाईन पध्दतीने पार पडली. जिल्हा बँकेची थकबाकी आता 2 हजार 46 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे बँकेतील ठेविदारांना वेळेत पैसे देणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत ठेविदारांना वेळेत पैसे देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. बँकेने वीजबिल भरणा केंद्र सुरु केले. तसेच थकबाकीदारांना ‘ओटीएस’ अंतर्गत सवलत देवून कर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2020 ते 30 ऑगस्ट 21 या कालावधीत तब्बल 688 कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली. एकूण थकबाकीच्या तुलनेत ही रक्कम तब्बल 31 टक्के वसूली बँकेने केली. याच पध्दतीने कर्ज वसूली करण्यासाठी बँकेने प्रत्येक तालुकानिहाय ‘टॉप 100’ थकबाकीदारांची यादी तयार करुन त्यांच्याकडून कर्ज वसूलीचे टार्गेट दिल्याची माहिती बँकेचे मुख्य प्रशासक मोहम्मद आरिफ यांनी दिली.

कामचुकार कर्मचार्‍यांचे वेतन थांबवले
बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना काही कर्मचारी कामचुकारपणा करतात. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांना जबाबदारी निश्चित करुन देण्यात आली आहे. जे कर्मचारी कामात कसूर करतात त्यांचे वेतन थांबवण्याची कारवाई केली आहे. तसेच अनेक कर्मचार्‍यांचे वेतन 50 टक्क्यांपर्यंत कमी केल्याचे बँकेचे प्रशासक मोहम्मद आरिफ यांनी सांगितले.