घरताज्या घडामोडीत्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांची पौषवारी यंदा रद्द

त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांची पौषवारी यंदा रद्द

Subscribe

वारकरी भक्तांच्या उत्साहावर पाणी, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

नाशिक : राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्र्यंबकेश्वर येथे जानेवारी अखेर होणारी संत निवृत्तिनाथांची पौष वारी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील वारकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. गतवर्षीही कोरोनामुळे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. त्र्यंबक उपविभागीय अधिकार्‍यांनी पौष वारीनिमित्त नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

श्री संत निवृत्तिनाथ यात्रा दरवर्षी पौष वद्य एकादशीला भरत असते. यावर्षी २५ ते २९ जानेवारी रोजी पौष वारी आहे. या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून किमान पाच लाख वारकरी, भाविक त्र्यंबकेश्वर येथे येतात. जवळपास ५०० ते ६०० पायी दिंड्या येत असतात. यातील काही दिंड्यांना तर शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र कोरोनामुळे ही वारी रद्द करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी यांसदर्भात नियमावलीही जाहीर केली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पौष वारी रद्द करण्यात आली असून दरवर्षी होणारे नित्योपचार पूजाविधीसाठी परवानगी देण्यात आली आहे. वारीसाठी पायी दिडयांना परवानगी नसेल. वारी मार्गावर दुकाने, स्टॉल्स, मनोरंजनाची साधने लावण्यास परवानगी राहणार नाही. यात्रोत्सवाच्या कालावधीत सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत कार्यक्रम करावे लागणार आहेत. २८ जानेवारीच्या रथोत्सवास परवानगी देण्यात आली असून रथोत्सवासाठी ५० पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. शासनाचे सर्व नियम पाळून वारी केली जाईल.
अ‍ॅड. भाउसाहेब गंभीरे, प्रशासक समिती, संत निवृत्तीनाथ मंदिर

अशी आहे नियमावली

  • त्र्यंबकेश्वरकडे जाण्यास पायी दिंडयांना जाण्यास परवानगी नसेल.
  • त्र्यंबकेश्वर शहरात व परिसरात यात्रा भरवता येणार नाही.
  • मंदिरात पूजाविधीसाठी ५० पुजारी, सेवेकरयांना उपस्थितीस परवानगी.
  • रथोत्सवात केवळ ५० व्यक्तींचीच उपस्थिती.
  • रथोत्सवात सहभागी होणार्‍यांना लस घेणे बंधनकारक
  • कार्यक्रमादरम्यान वाद्य वाजवण्यास मनाई.
  • श्री निृत्तीनाथ समाधी मंदिरात ५० हून व्यक्ती एकत्र येण्यास मनाई.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -