घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये सराईत सोनसाखळी चोरट्यांसह सोनाराला अटक

नाशिकमध्ये सराईत सोनसाखळी चोरट्यांसह सोनाराला अटक

Subscribe

सोन्याचे मंगळसूत्र, दुचाकी जप्त; गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई

नाशिक – मौजमजेसाठी चोरीचा मार्ग पत्करत तब्बल ५६ महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने हिसकावणार्‍या २७ वर्षीय सिव्हिल इंजिनीअरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्याची घटना ताजी असताना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन सराईत सोनसाखळी चोरट्यांना अटक केली आहे.

दोघांनी उपनगर, मुंबई नाका, गंगापूर परिसरात दुचाकीवरुन प्रवास करणार्‍या महिलांचे दागिने हिसकावल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी दोघांसह त्यांच्या एका मित्रास आणि सोनारास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी एका चोरट्याच्या ताब्यातून ७३ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र व दुचाकी असा एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

सईद आसमोहंमद सैय्यद उर्फ छोट्या (वय २९, रा.पखाल रोड, नाशिक), साथीदार आफताब नजीर शेख, अजय सिंग, सोनार विशाल दुसाने अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. नाशिक शहरात दुचाकीवरुन जाणार्‍या महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत व चेन हिसकावण्याच्या घटना समोर आल्याने पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. उपनगरमध्ये दुचाकीचालक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार उपनगर पोलीस व नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास सुरु केला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पथकाने चोरट्याचा शोध घेतला असता पोलीस अंमलदार रवींद्र बागूल यांना चोरट्याची ओळख पटवण्यात यश आले. चोरटा पंचवटीतील गणेशवाडी परिसरातील असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार पथकाने त्यास ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने साथीदार शेखसमवेत चोरी केल्याची कबुली दिली. शिवाय, चोरीचे दागिने मित्र अजय सिंगमार्फत सोनार विशाल दुसाने यास विक्री केल्याचे चोरट्यांनी पथकास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -