घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआयुक्तांच्या आश्वासनानंतर वॉटरग्रेस सफाई कामगारांचे उपोषण मागे; मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

आयुक्तांच्या आश्वासनानंतर वॉटरग्रेस सफाई कामगारांचे उपोषण मागे; मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

Subscribe

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या वॉटरग्रेस प्रोडक्ट्स कंपनीने बेकायदेशीररीत्या काढल्याने उपासमारीचे संकट ओढवलेल्या अन्यायग्रस्त २५० सफाई कामगारांनी सनदशील मार्गाने न्याय मिळवण्यासाठी सोमवारी (दी.२०) सकाळी ०९.०० वाजेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू केले होते. नाशिक महानगर पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास बसलेल्या कामगारांचे उपोषण सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. अखेर या प्रकरणी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दोन दिवसात या कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेत असल्याचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी सांगितले. दरम्यान, विना परवानगी उपोषण, आंदोलन तसेच घोषणाबाजी केल्या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक शहर स्वच्छतेचा कंत्राटदार असलेल्या वॉटरग्रेस प्रोडक्ट कंपनीने शहरातील कचरा गोळा करणे तसेच स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीने सफाई कामगारांची नेमणूक केली होती. चार महिण्यापूर्वी दिवाळीच्या तोंडावर या कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युनियन स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असता, ठेकेदाराने युनियनला विरोध केला आहे. तसेच काही कामगारांना ठरकेदारकडून मारहाण झाल्याचाही प्रकार घडला होता. दरम्यान, स्वच्छता कामगारांनी काम बंद आंदोलन केल्याचा ठपका ठेवत ठेकेदाराने आंदोलनात सहभागी ४५०हुन अधिक कामगारांना कामावरून कमी केले होते. ठेकेदाराने कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी या कामगारांनी मनसेच्या नेतृत्वात प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यावर निर्णय होऊ शकत नसल्याने त्यांनी अखेर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. सलग दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या आमरण उपोषणाची दखल मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेत दोन दिवसात या कामगारांना दोन दिवसात कामावर घेऊ असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेत असल्याचा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, नाशिक पोलिस आयुक्तालया कडून शहरात मनाई आदेश सुरू असल्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तांची लेखी पूर्वपरवानगी न घेता एकत्र येऊन मोठ्याने घोषणा देऊन आमरण उपोषणास बसल्याप्रकरणी सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, मनसे कामगार सेना चिटणीस तुषार जगताप, प्रदेश उपाध्यक्ष परशुराम साळवे, ज्ञानेश्वर बागडे यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -