Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शरद पवारांकडून नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा जाहीर, पण....; राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांकडून नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा जाहीर, पण….; राजकीय वर्तुळात खळबळ

Subscribe

राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधी कोणती खेळी करतील हे ही सांगता येत नाही. हे आज शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय.

नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजप आघाडीचं सरकार येणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीपीपी सर्वात मोठे पक्ष ठरले आहेत. नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्यात सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणत्याच विरोधी पक्षाला दोन अंकी संख्या गाठता आलेली नाही. त्यामुळे सर्वच पक्ष भाजप आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत आहेत. यात एकेकाळी भाजपचा कट्टर विरोधक मानला जाणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सुद्धा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना आपला पाठिंबा देणार अशा आतापर्यंत केवळ चर्चा सुरू होत्या. पण यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे सत्तेसाठी भाजपच्या मांडीला मांडी लावण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.

60 सदस्य असलेल्या नागालॅंड विधानसभेत एनडीपीपीने सर्वाधिक २५ जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल भाजपने १२, रिपब्लिकन पक्षाने दोन, राष्ट्रवादीने ७ आणि नॅशनल पिपल्स पार्टीने ५ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत ४ अपक्ष निवडून आले आहेत. जनता दलाला एक जागा जिंकता आली आहे. अशात सगळेच पक्ष भाजपला आपला पाठिंबा जाहीर करत असून सगळ्यांचं लक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निर्णयाकडे लागलं होतं. आतापर्यंत यावर अनेक चर्चा आणि अंदाजाचा महापूर आला होता. परंतू यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णविराम दिलाय.

- Advertisement -

महाराष्ट्राचं आणि देशाचं एकंदरीत राजकारण पाहिलं असता भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीनं हा इतिहास बदलणार अशी शक्यता वाटत असतानाच अचानक दोन्ही पक्षात पुन्हा ताटातूट झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत या राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये शत्रुत्व सुरूच आहे. अशात नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीने ७ जागा जिंकल्यानंतर सरकारच्या पाठिंब्याबाबत शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं होतं.

अखेर आज माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागालॅंडमधील सरकारबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी नागालॅंडच्या सरकारबाबत सवाल केला असता शरद पवार यांनी नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. परंतू आपला पाठिंबा हा नागालॅंडच्या मुख्यमंत्र्यांना आहे, भाजपाला नाही, असं म्हणत भाजपसोबत थोडं अंतर कायम असल्याचं दाखवून दिलं. येत्या दोन दिवसांत पार्लमेंटचे अधिवेशन सुरू होणार आहे, त्यात एकत्र बसून यावर चर्चा करू असं देखील शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधी कोणती खेळी करतील हे ही सांगता येत नाही. हे आज शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय.

- Advertisment -