Sanjay Raut : राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही…, संजय राऊत यांचे ट्वीट चर्चेत

संग्रहित छायाचित्र

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. अनेक नेत्यांनी शरद पवार यांना फोन करून अध्यक्षपद न सोडण्याची विनंती केली. तर महाविकास आघाडीतील (MVA) प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाने, जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो, असा तर्कही मांडला होता. आता याच अनुषंगाने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी, राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही, असे सूचक ट्वीट केले आहे.

हेही वाचा – शरद पवारच अध्यक्ष राहावे, असा ठराव मांडणार – छगन भुजबळ

शरद पवार हे पूर्णवेळ राजकारणी. अशा राजकीय माणसाने राजीनामा देऊन खळबळ उडवावी यामागचे राजकारण काय? याचा शोध काही जण घेऊ लागले तर आश्चर्य नाही. पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपाचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय? हा पहिला प्रश्न. विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय? हा दुसरा प्रश्न, असे मत ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या अग्रलेखात काल, गुरुवारी मांडले होते.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, मात्र भविष्यात त्यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगतानाच शिवसेना फुटली. चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटना व पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी, जिल्हास्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो, असा तर्कही या अग्रलेखात मांडण्यात आला होता.

आता याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून राजकारणात अपघाताने काहीही घडत नसल्याचे म्हटले आहे. राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही. तसे घडले असल्यास, तशा प्रकारे ते नियोजितच होते, हे पैज लावून सांगू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.