बनावट दस्तावेजाद्वारे इराणला जाणार्‍या प्रवाशाला अटक

इराणला जाण्यासाठी बनावट दस्तावेज बनवून ते खरे असल्याचे भासवून विमानतळ अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रदीपराज कनगा विजयन या प्रवाशाला सहार पोलिसांनी नुकतीच अटक केली.

मुंबई : इराणला जाण्यासाठी बनावट दस्तावेज बनवून ते खरे असल्याचे भासवून विमानतळ अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रदीपराज कनगा विजयन या प्रवाशाला सहार पोलिसांनी नुकतीच अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली. (Passenger going to Iran arrested on fake document)

चंद्रशेखर मुकुंद सावंत हे सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या आठवड्यात १५ फेब्रुवारीला ते विमानतळावर कर्तव्य बजावित होते. यावेळी तिथे प्रदीपराज हा दुबईला जाण्यासाठी आला होता. त्याच्या पासपोर्टसह सीडीसी, बोर्डिंग पास, ई मायग्रेट लेटर आणि शिप जॉयनिंग लेटरची इमिग्रेशन अधिकार्‍यांकडून तपासणी करण्यात आली.

प्रदीपराज दुबईहून इराणला जाणार होता. तिथे त्याला जहाजावर नोकरी मिळाली होती, मात्र त्याने सादर केलेल्या कागदपत्रांविषयी चंद्रशेखर सावंत यांना संशय आला होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान प्रदीपराजने ई मायग्रेट आणि शिप जॉयनिंगची सादर केलेली कागदपत्रे बनावट होती, असे दिसून आले.

प्रदीपराज हा मूळचा चेन्नईच्या पुनूस्वामी स्ट्रिट, न्यू वॉशरमेनपेटचा रहिवासी आहे. इराणला जाण्यासाठी त्याने बनावट दस्तावेज बनविल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी चंद्रशेखर सावंत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रदीपराजविरुद्ध बनावट दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

याच गुन्ह्यात त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. इमिग्रेशन अधिकारी चंद्रशेखर सावंत यांच्या सतर्कतेमुळे बनावट कागदपत्रांचा वापर करून प्रदीपराजचा इराणला जाण्याचा प्रयत्न फसल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून ‘त्या’ शिवसैनिकांची हकालपट्टी; वाचा नेमके प्रकरण काय?