घरमहाराष्ट्रPoonch terror attack : कालपर्यंत युद्धाची भाषा... आता बुद्धाची भाषा; ठाकरे गटाची...

Poonch terror attack : कालपर्यंत युद्धाची भाषा… आता बुद्धाची भाषा; ठाकरे गटाची टीका

Subscribe

मुंबई : भारताच्या दुष्मनांना धडा शिकवू, गोळीला गोळीने उत्तर देऊ, पाकिस्तानला (China) जन्माची अद्दल घडवू, पाकिस्तानने गिळलेला काश्मीर पुन्हा मिळवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करू व ते करण्याइतकी 56 इंचाची आपली छाती असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narendra Modi) छातीठोकपणे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कश्मीरच्या भूमीवर आणि लडाख, अरुणाचलच्या भूमीवर उलटेच घडताना दिसत आहे. मोदी हे कालपर्यंत युद्धाची भाषा करीत होते, ते आता बुद्धाची भाषा बोलू लागले. सत्य सांगायचे तर पाकड्यांसमोर ते युद्धाची भाषा करतात, पण चीनच्या आक्रमणापुढे त्यांना बुद्ध आठवतो, अशी जहरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

पूंछ-जम्मू मार्गावर दहशतवादी (Poonch terror attack) आपल्या जवानांवर बॉम्बहल्ले करीत असताना आपले पंतप्रधान दिल्लीत जागतिक बौद्ध शिखर परिषदेत भाषण देत होते. यावेळी पंतप्रधानांनी जगाला सांगितले, ‘‘भारत युद्धाच्या नव्हे तर, बुद्धाच्या मार्गावरूनच वाटचाल करतोय.’’ बुद्धाचा मार्ग हा शांततेचा मार्ग आहे. त्याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण कश्मीर खोऱ्यात दहशतवादी जो हिंसाचार रोज घडवीत आहेत, तो शांततेच्या मार्गाने खरंच संपवता येईल काय? असा सवाल ठाकरे गटाने ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.

- Advertisement -

नाहीतर सीमेवर हत्यारबंद ईडी, सीबीआयला पाठवा
केंद्रातले सरकार 365 दिवस निवडणुकांच्या राजकारणात, गौतम अदानींचा बचाव करण्यात, विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याच्या कारस्थानात अडकून पडले आहे. त्यामुळे पुलवामा, उरी, पठाणकोटपासून कालच्या पूंछ-जम्मू मार्गापर्यंत आमच्या जवानांवर अतिरेक्यांचे हल्ले सुरू आहेत. काश्मिरी पंडितदेखील असुरक्षित आहेत. 2016 मध्ये देशात नोटाबंदी लादली तेव्हा काळ्या पैशाबरोबर दहशतवाद संपविण्याचेही कारण देण्यात आले होते. मात्र काश्मीरमधील दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. पुलवामाचा हल्लादेखील नोटाबंदीनंतरच झाला होता. मात्र ना त्यावर पंतप्रधान बोलले ना आता जम्मू-पूंछ मार्गावरील हल्ल्याबाबत. कश्मीरातील हल्ल्यांवर तरी पंतप्रधान मोदी काही बोलतील काय? युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा. नाहीतर सीमेवर हत्यारबंद ईडी, सीबीआयला पाठवा. काय सांगावे, दुश्मन भाजपमध्ये प्रवेश करून शरणागतीच पत्करतील, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

बुद्धाचा मार्ग कोठे दिसतोय का?
चीन हा बुद्ध विचारांचा देश आहे. हिंदुस्थानच्या सीमा सगळ्यात जास्त कोण कुरतडत असेल तर तो चीन आहे. चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे, चीन अरुणाचल प्रदेशचा लचका तोडू पाहत आहे. चीन हिंदुस्थानच्या विरोधात पाकिस्तान, नेपाळला मदत करीत आहे. चीन हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला तडे देत आहे. हे करताना चीन असे कधीच म्हणत नाही की, भगवान बुद्धाच्या भविष्य आणि शाश्वततेच्या मार्गावर त्याची वाटचाल सुरू आहे. चीन साम्राज्यवादी आहे आणि इतर देशांवर आर्थिक व इतर आक्रमणे करून त्याने त्याचे साम्राज्य वाढवले आहे. चीनमध्ये हुकूमशाही आहे व आवाज उठवणाऱ्यांना संपवले जाते. तेथे बुद्धाचा मार्ग कोठे दिसतोय का? असा प्रश्नही या अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

काहीतरी घोटाळा आहे…
भारताची ‘अतिथी देवो भव’ अशी संस्कृती असल्याचे पंतप्रधान म्हणतात. पण लडाख, अरुणाचलमध्ये घुसलेले व कश्मीरात घुसून आपल्या जवानांवर हल्ले करणारे ‘अतिथी’च आहेत असे मानावे काय? मजबूत पंतप्रधान व कणखर गृहमंत्री देशाला लाभला असताना लष्कराच्या छावण्यांवर, लष्कराच्या वाहनांवर अतिरेकी नामक ‘अतिथी’ हल्ले करण्यास धजावतात. म्हणजे काहीतरी घोटाळा नक्की आहे, अशी टीका मोदी सरकारवर केली आहे.

लोकभावनेस चिरडून सत्ता गाजवली जातेय
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही सध्या मोदी-शहांची शस्त्र आहेत, पण त्या शस्त्रांना चिनी आणि पाकिस्तानी ‘अतिथी’ घाबरतात असे दिसत नाही. जम्मू-कश्मीरचे विभाजन केले, पूर्ण राज्याचा दर्जा काढला, पण गेल्या चारेक वर्षांपासून तेथे निवडणुका घ्यायला दिल्लीचे सरकार घाबरत आहे. निवडणुकांशिवाय राज्य करायचं – मग त्या मुंबईसह महाराष्ट्रातील महानगरपालिका असोत नाहीतर जम्मू-कश्मीरसारखे संवेदनशील राज्य, लोकभावनेस चिरडून सत्ता गाजवायची हे विद्यमान राज्यकर्त्यांचे धोरण असल्याची बोचरी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -