घरमहाराष्ट्रपुण्यात पूर; पण मुख्यमंत्री आणि पालकमंत्री खूपच दूर!

पुण्यात पूर; पण मुख्यमंत्री आणि पालकमंत्री खूपच दूर!

Subscribe

पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र दिल्लीत शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेसाठी गेल्यामुळे विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

एकीकडे पुणे, बारामती आणि आसपासच्या परिसरामध्ये बुधवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडल्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांममध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, असं असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त ट्वीटरवर शोक व्यक्त करून दिल्लीला युतीच्या चर्चेसाठी धाव घेतली आहे. त्यांच्यासोबत जिथे मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे, त्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील दिल्लीत चर्चेसाठी गेले आहेत. या मुद्द्यावर आता विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. ‘सरकारला पूरस्थितीचं गांभीर्य नाही’, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.

‘सगळा कारभार रामभरोसे!’

सातारा-सांगली-कोल्हापूरमध्ये पूर आला तेव्हा भाजपची महाजनादेश यात्रा सुरू होती. याचाच संदर्भ घेत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. सगळा कारभार रामभरोसेच सुरू आहे. एकीकडे पुरामुळे माणसं मरत असताना भाजपचे मंत्री मात्र निवडणुकीचे कार्यक्रम करत आहेत. कोल्हापूर-सांगली पुरावेळीही मुख्यंमत्री महाजनादेश यात्रेमध्ये मग्न होते’, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

- Advertisement -

Live Update – पुण्यात पावसाचा कहर; भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू; ४ जण बेपत्ता

मुख्यमंत्र्यांनी फक्त केलं ट्वीट!

बुधवारी संध्याकाळपासूनच पुण्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. बारामतीमध्ये देखील कोसळलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. पुण्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पुण्यात अरण्येश्वर कॉलनीमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, पावसाचं भयंकर स्वरूप पाहाता मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यात शाळांना सुट्टी देण्यात आली असून बारामतीमध्ये देखील सुरक्षेचे उपाय म्हणून शाळा-कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे.

- Advertisement -

याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी सकाळीच या दुर्घटनेवर ट्वीट करून परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचं सांगितलं. मात्र, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यामुळे भाजपवर टीका होऊ लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -