घरताज्या घडामोडीसहकारी कारखान्याचा उपयोग राजकीय सूड उगवण्यासाठी, राधाकृष्ण विखे पाटलांची राज्य सरकारवर टीका

सहकारी कारखान्याचा उपयोग राजकीय सूड उगवण्यासाठी, राधाकृष्ण विखे पाटलांची राज्य सरकारवर टीका

Subscribe

राज्यात पहिली सहकार परिषद प्रवरा येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला देशाचे पहिलेच सहकार मंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. परंतु या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले नाही. राज्य सरकारने सहकार क्षेत्रातील कारखान्यांचा उपयोग राजकीय विरोधकांना नामोहरण करण्यासाठी केला असल्याचा आरोप भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सहकार परिषदेवरुन राज्य सरकार विरुद्धा भाजप असा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते आणि सहकार परिषदेचे आयोजक राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे. देशातील पहिली सहकार परिषद राज्यातील अहमदनगरमधील प्रवरा येथे आय़ोजित करण्यात आली आहे. राज्यातील बड्या नेत्यांना या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. परंतु राज्यातील वरिष्ठ नेते आणि सहकार क्षेत्राचा अनुभव असलेले राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले नाही. यावरुन विखे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला परंतु विखे पाटलांनी प्रश्नाचे उत्तर देणं टाळले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष येणार आहेत. शिखर संस्थेच्या प्रमुखांना बोलवलं असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

राजकीय सूड उगवण्यासाठी सहकार क्षेत्राचा वापर

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात १०० टक्के साखर कारखानादारीचे उदाहरण पाहिले तर १०० टक्के उद्योग साखर क्षेत्रात होता. आज सहकार क्षेत्राचा सहभाग ४५ टक्के राहिला आहे. कारखाने खाजगी का झाले? सहकारी कारखान्यांचे खाजगीकरण का करण्यात आले? कारखाने कवडीमोल भावाने विकण्याची वेळ का आली? म्हणजे फक्त राज्य सरकारने सहकार कारखान्याचा उपयोग आपल्या राजकीय स्पर्धकांना नामोहरण करण्यासाठी केला आहे. सहकार क्षेत्राच्या खाजगीकरणाला ज्यांनी प्रोत्साहन दिलं त्यांच्याबाबत आम्हाला आक्षेप असल्याचे राधाकृष्ण पाटील यांनी सांगितले.

अमित शाह राहणार उपस्थित

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. आज ते लोणी येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सहकाराची सुरूवात झालेल्या प्रवरा इथं देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे तसंच विचारमंथनही होणार आहे. अमित शहा यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अमित शहा सहकार क्षेत्रासंदर्भात या परिषदेत काही महत्त्वाच्या घोषणा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराबाबत राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शहा यांचा हा दौरा आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सहकार चळवळीत अनेक थोर नेत्यांचा सहभाग आहे. यात वसंतदादा पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, गुलाबराव पाटील, अण्णासाहेब गोडबोले, लक्ष्मणराव इनामदार, डॉ. आचार्य, वसंतराव देवपुजारी यांचे योगदान आहे.

१७ जून १९५० रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर (लोणी) मध्ये आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरचा पहिला साखर कारखाना राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे प्रवर्तक डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला.

शेतकर्‍यांच्या सहकारी साखर कारखान्यांची योजना विखे पाटील यांनी यशस्वी रीत्या राबविल्यामुळे भारत सरकारने त्याचा लाभ आणि माहिती भारतातील विविध प्रतिनिधी आणि अभ्यासू शेतकरी यांना व्हावी, म्हणून अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्यांची पहिली परिषद १९५६ साली प्रवरानगर येथे भरवली.


हेही वाचा : ओमिक्रॉनपासून संरक्षणासाठी तिसरा डोस पुढील वर्षापासून, या लोकांपासून होणार सुरुवात


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -