घरदेश-विदेशखासदारकी रद्द झालेले राहुल गांधी काही पहिले नाही, 'या' नेत्यांनाही मिळाली ही...

खासदारकी रद्द झालेले राहुल गांधी काही पहिले नाही, ‘या’ नेत्यांनाही मिळाली ही शिक्षा

Subscribe

न्यायालयात दोषी आढळल्यानंतर शिक्षा सुनावल्यामुळे खासदारकी रद्द झालेले राहुल गांधी हे काही पहिले नेते नाहीत.

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी आज (शुक्रवार) रद्द झाली आहे. मोदी आडनावावरुन (Modi Surname Case) त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मानहानीच्या खटल्यात त्यांना सूरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संसद सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द ((Disqualified from membership of Lok sabha) केले आहे. न्यायालयात दोषी आढळल्यानंतर शिक्षा सुनावल्यामुळे खासदारकी रद्द झालेले राहुल गांधी हे काही पहिले नेते नाहीत.

राहुल गांधींच्या 2013 मधील निर्णयामुळेच गेली खासदारकी…
लोकप्रतिनिधी कायदा (1951) नुसार, आमदार किंवा खासदाराला भारताच्या कोणत्याही न्यायालयाने दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावली तर त्यांची आमदारकी किंवा खासदारी रद्द होईल, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने 2013 साली दिला होता. लिली थॉमस विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये हा निर्णय दिला होता. अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वात तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे सत्ताधारी युपीएच्या सर्वच घटकपक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात एक अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेतला होता. या अध्यादेशातून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र या अध्यादेशाला राहुल गांधी यांचा विरोध होता. 27 सप्टेंबर 2013 च्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी नाट्यमय प्रवेश केला आणि तो अध्यादेश फाडून फेकला. राहुल गांधी पर्यायाने काँग्रेसच्या विरोधामुळे तो अध्यादेश कायद्याच्या स्वरुपात संमत होऊ शकला नाही. त्याचे परिणाम आज पर्यंत पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

लालू प्रसाद यादव
माजी रेल्वे मंत्री तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांना 2013 साली चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा झाली होती. राहुल यांनी अध्यादेश संसदेत येऊ न दिल्यामुळे त्याची पहिली झळ ही लालू यादव यांना बसली होती. चारा घोटाळ्यातील शिक्षेनंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती.

आझम खान
उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान (Azam khan) यांना 2022 मध्ये हेट स्पीच प्रकरणी शिक्षा झाली आहे. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. ते रामपूर मधून लोकसभेवर निवडून गेले होते.

- Advertisement -

जयललिता
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता (J Layalalithaa) यांची खासदारकी एकदा नाही तर दोन वेळा रद्द झाली होती. 2002 साली भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना शिक्षा झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा झाली. या दोन्ही प्रकरणानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती.

रशीद मसूद
काँग्रेस खासदार रशीद मसूद (Rasheed Masood) यांना एमबीबीएस जागा घोटाळ्यात खासदारकी गमवावे लागली आहे. काझी रशीद काँग्रेसचे राज्यसभा खासदार होते. राज्यसभेचे खासदार असताना ते एमबीबीएस जागा घोटाळ्यात दोषी आढळले होते. न्यायालयाने त्यांना 2013 मध्ये चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली.

काय आहे राहुल गांधींचे प्रकरण?
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 13 एप्रिल 2019 रोजी राहुल गांधी हे कर्नाटकातील कोलारमध्ये भाषण करत होते. ते म्हणाले, ”नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसमान का आहे? सर्वच चोरांचे आडनाव मोदी का असते?” (Modi Surname Case) राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सुरत पश्चिम येथील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समाजाचा अपमान केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण सुरतच्या न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात राहुल गांधी यांना याआधी 9 जुलै 2020 रोजी सुरत न्यायालयात हजर राहावे लागले होते. तर गेल्या महिन्यात पूर्णेश मोदी यांनी या प्रकरणी लवकर निर्णय घेण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -