घरमहाराष्ट्रखड्ड्यांचा जिल्हा.. रायगडची नवी ओळख

खड्ड्यांचा जिल्हा.. रायगडची नवी ओळख

Subscribe

निसर्गाने भरभरून दिलेल्या रायगड जिल्ह्याचा सर्वांनाच अभिमान वाटत असताना आता जिल्ह्यातील जागोजागीच्या रस्त्यांवर, प्रमुख मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांचाही आता सार्थ ‘अभिमान’ बाळगावा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्डे व सुमार दर्जा वाटावा असा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 66) सध्या टीकेच्या भोवर्‍यात सापडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मार्गावर बुधवारी आयोजिलेली खड्डे मोजण्याची स्पर्धा या मार्गासह अन्य प्रमुख मार्गांना उर्जितावस्था मिळवून देईल का, याकडे तमाम रायगडवासीयांसह प्रवासी व वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.

दरवर्षी मुसळधार पाऊस कोसळणार्‍या या जिल्ह्यात भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले ठेकेदार व त्यांच्या भोवती अदृश्य सुरक्षेचे कवच निर्माण करणारे राजकारणी व बडे अधिकारी यांच्यामुळे एकही रस्ता दर्जेदार नसून पावसाळ्यात या रस्त्यांवरील प्रवास म्हणजे नकोसा अनुभव असतो. यापैकी प्रमुख मार्ग असलेल्या मुंबई-गोवा मार्गावरील पळस्पे ते इंदापूर या साडेनऊशे कोटींच्या पहिल्या टप्प्याचे काम ११ वर्षांपूर्वी गाजावाजा करून सुरू करण्यात आले. सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्राईव्हेट लिमिटेड कंपनीला हे काम देण्यात आले आहे. सुरूवातीपासून कंपनीचे काम वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. मात्र दिल्लीश्वरांच्या आशीर्वादामुळे या कंपनीचा केसही वाकडा होऊ न शकल्याने कामात अखंड मनमानी सुरू आहे.

- Advertisement -

सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबद्दल प्रारंभी अनेकांनी शंका उपस्थित केली होती. मात्र काहीच फरक न पडल्याने कूर्मगतीने काम सुरू राहिले आहे. अलिकडे हे काम बंद झाल्यानंतर ते अन्य ठेकेदाराकडे सोपविण्यात आले असले तरी सर्वेसर्वा मात्र सुप्रीम कंपनीच आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करणे (बीओटी) या तत्वावर सुप्रीम कंपनी तब्बल २१ वर्षे या मार्गावर टोल वसुलीचे काम करणार आहे. रस्त्याचे काम सुरू असताना अशी परिस्थिती असेल तर पुढे काय होईल, अशी धास्ती वाहनचालकांना वाटत आहे. या मार्गावर इतके प्रचंड खड्डे निर्माण झाले आहेत की ते मोजायला एक महिनाही अपुरा पडेल. या खड्ड्यांमुळे इंदापूरपासून पळस्पेपर्यंतचा दीड-दोन तासांचा प्रवास चार ते पाच तासांच्या पुढे जात आहे.

या कामाबाबत खा. सुनील तटकरे यांनी लोकसभेत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याचे खापर आघाडी सरकार फोडतानाच कसाबसा आम्ही नवीन ठेकदार कामाला लावल्याची व्यथा मांडली. मंत्रीच असे हतबल झाल्यासारखे बोलू लागल्याने पुढे काय, हा सवाल अनुत्तरित राहिला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी गडकरी नागोठण्यात आले असता या मार्गाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी आपण जातीने लक्ष देणार असल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

खा. सुनील तटकरे यांनी निदान लोकसभेत तरी यावर प्रश्न उपस्थित केला, अन्य लोकप्रतिनिधींची याबाबतची अनास्था मात्र अकालनीय आहे. जनतेनेही यावर आवाज उठवला पाहिजे. मनसेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यातून आता माघार नाही. नागरिकांनीही आजच्या वडखळपासून सुरू होणार्‍या स्पर्धेत सहभाग घ्यावा.
-गोवर्धन पोलसानी, जिल्हा संघटक, मनसे

प्रकल्पावर स्वतंत्र अभियंत्याद्वारे देखरेख ठेवली जात असून, प्राधिकरण त्यावर लक्ष ठेवून आहे. येत्या 25 ऑगस्टपर्यंत खड्डे भरण्याचे काम करण्यात येऊन नंतर पाऊस थांबताच त्यावर डांबरीकरण केले जाईल. रस्ता सुस्थितीत ठेवण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले असून, मनसेने आंदोलन स्थगित करून चौपदरीकरणाच्या कामात सहकार्य करावे.
-प्रशांत फेगडे, महाप्रबंधक (तांत्रिक) व प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -