घरमहाराष्ट्रRaj Thackeray at Shivaji park : नरेंद्र मोदींना पाठिंबा पण...; राज...

Raj Thackeray at Shivaji park : नरेंद्र मोदींना पाठिंबा पण…; राज ठाकरेंनी जाहीर केला लोकसभेनंतरचा अजेंडा

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा 2024 निवडणूक लढणार नाही, असे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून आम्हाला राज्यसभा नको किंवा विधान परिषदही नको अशी भूमिका राज ठाकरे यांनी त्यांच्या समर्थकांना उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केली आहे. महायुतीसोबतच्या जागावाटपाच्या चर्चा, वाटाघाटी करण्याचा माझा स्वभाव नसल्याचे स्पष्ट करत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला माझा पाठिंबा असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे. त्यासोबच कार्यकर्त्यांना त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. एक प्रकारे राज ठाकरेंनी त्यांचा विधानसभेचा अजेंडा लोकसभा निवडणुकीदरम्यानच जाहीर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार. ते महायुतीमध्ये सहभागी होणार का? मनसेचं इंजिन महायुतीला जोडलं जाणार, की मनसे शिंदेंच्या शिवसेनेत विलीन केली जाणार, अशा सर्व शक्यता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चील्या जात होत्या. या सर्व प्रश्नांची उत्तर एक, एक कर राज ठाकरेंनी त्यांच्या शिवतीर्थावरील भाषणातून दिली आहेत.

- Advertisement -
raj thackeray on narendra modi
राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा दिला आहे

राज ठाकरेंचा आगामी अजेंडा 

राज ठाकरे म्हणाले की, एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही. रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, असे आगामी काळाचा अजेंडाच राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केला आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊंतावर राज ठाकरे बरसले 

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मोदींना करत असलेल्या विरोधावरुन त्यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, आज उद्धव ठाकरे, संजय राऊत नरेंद्र मोदींवर टीका करतात. कारण काय तर मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. मग उद्धव ठाकरे, संजय राऊतांना इतक्याच मोदींच्या भूमिका पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात का नाही उतरलात. तेव्हा सत्तेचा मलिदा खात राहिलात.

- Advertisement -

हेही वाचा : Raj Thackeray : मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार! राज ठाकरेंची शिवतीर्थावरुन गर्जना

…तर देशात अराजक

नरेंद्र मोदींकडून देशाला अपेक्षा आहे असे सांगत राज ठाकरे म्हणाले की, माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे की, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या. तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या. आपला भारत देश जगातला सर्वात तरुण देश आहे. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला तर मात्र ह्या देशात अराजक येईल. 2024 ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी आहे, असे सांगत राज ठाकरेंनी, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. असे जाहीर केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. राज ठाकरेंनी 2014, 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. आता सलग तिसरी 2024 ची निवडणूक मनसे लढणार नाही, अशी घोषणा पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -