राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी – रामदास आठवले

आपण भारतात राहणारे सर्व भाषिक एकच आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रियांनी नाही तर उत्तर भारतीय ब्राह्मण असणाऱ्या गागाभट्टांनी केला होता हा इतिहास लक्षात ठेवायला हवा, असा सल्लाही रामदास आठवले यांनी ठाकरे यांना दिला.

Ramdas Athavale has expressed his desire to have Devendra Fadnavis as Chief Minister again

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्यात घुसू दिले जाणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण यांनी दिला आहे. तर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही त्यांची री ओढली आहे.

उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. सातारा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांना एवढ्या दिवसांनी अयोध्या का आठवली. त्यांना अयोध्याला जायचे आहे तर त्यांनी यापूर्वीच जायला हवे होते. आपण भारतात राहणारे सर्व भाषिक एकच आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रियांनी नाही तर उत्तर भारतीय ब्राह्मण असणाऱ्या गागाभट्टांनी केला होता हा इतिहास लक्षात ठेवायला हवा, असा सल्लाही रामदास आठवले यांनी ठाकरे यांना दिला.

राज ठाकरे वादग्रस्त विधान करून जनतेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात.  पण त्यांनी वाद लावण्याची भूमिका घेतली तर त्यांना यश येणार नाही. त्यांनी भोंगे पुढे करून वाद वाढवण्याचे कारण नाही. त्यांच्या भूमिकेला आमचा आणि भाजपचा पाठिंबा  नाही. हनुमान चालीसा, भोंगा ही त्यांची भूमिका योग्य नाही . त्यांच्या मनात हिंदुत्वाची जाणीव झाली झाली आहे, ही गोष्ट चांगली आहे. त्यांना सर्व हिंदू समाजाचा नाही तर मूठभर लोकांचा पाठिंबा आहे, अशी टिकाही आठवले यांनी केली.

मागील आठवड्यातही रामदास आठवले यांनी अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांच्यावर टिका केली होती. उत्तर भारतीयांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये जाण्याचा अधिकार नाही, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला होता.