अंबानी स्फोटक प्रकरण: स्कॉर्पिओ मालकाचा संशयास्पद मृत्यू; सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया

Ambani Bomb Scare Don't send me to NIA cell says sachin vaze
सचिन वाझे

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या घटनेमध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्कोर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण आता याप्रकरणाबाबत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘याबाबत मला काहीच माहिती नाही आहे. मनसुख हिरेन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी पोलीस आणि काही पत्रकार सतत फोन करत आहे, असे म्हटले होते,’ अशी माहिती सचिन वाझे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

२५ फेब्रुवारी रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी सापडली. यामुळे मुंबईसह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणाचा तपास पहिल्यांदा एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांच्या हाती होता. पण त्यानंतर सचिन वाझे यांना या तपासातून हटवून दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला देण्यात आला होता.

सचिन वाझे नेमके काय म्हणाले?

‘या घटनेबाबत मला काहीच माहित नाही आहे. आम्ही या घटनेबाबत जाणून घेण्यासाठी ठाण्याला चाललो आहोत. मनसुख हिरेन याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये मनसुख हिरेनने सांगितले होते की, ‘मला काहीजण फोन करून त्रास देत आहेत. त्यामध्ये पोलीस आणि पत्रकारांचा समावेश आहे.’ तसेच ज्यावेळेस अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली त्यानंतर सर्वप्रथम मी गेलो नव्हतो, असे सांगून त्यांनी स्वतःवर लावलेले आरोप फेटाळले आहेत.


हेही वाचा –  स्कॉर्पियोच्या मालकाचा मृतदेह सापडला मुंब्रा रेती बंदरच्या खाडीत