घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपोलिसांच्या कर्तव्याला सलाम! शिवमहापुराण कथा सोहळ्यात शोधली हरवलेली ६० मुले

पोलिसांच्या कर्तव्याला सलाम! शिवमहापुराण कथा सोहळ्यात शोधली हरवलेली ६० मुले

Subscribe

गस्त असो किंवा कोणतीही अडचण नाशिक शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी तत्पर असल्याचे शिवमहापुराण कथा सोहळ्यातून समोर आले. पाच दिवसांच्या या सोहळ्यात गर्दीमध्ये हरलवेली तब्बल ६० मुले मदत केंद्रात येताच पोलिसांनी स्वत: तक्रार नोंदवून घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत पालकांना शोधून काढत मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. हरवलेल्या मुलांना पाहून कुटुंबियांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे मुले परत मिळाल्याने पाल्याने मनोमन त्यांचे आभार मानले.

नाशिक शहर पोलिसांच्या परिमंडळ दोन हद्दीतील पाथर्डी गाव परिसरात २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जिल्हाभरातून लाखो भाविक यायचे. अनेक महिला, आजी, आजोबा, नातेवाईक सोहळ्यास नातवांना घेऊन यायचे. गर्दीत कोणाचीही ताटातूट होवू नये, यासाठी पोलिसांकडून सोहळ्यात वारंवार ध्वनीक्षेपकांवरून मुलांच्या खिशात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक ठेवण्याचेही आवाहन केले जायचे. मात्र, गर्दीमध्ये चिमुकली आणि त्यांच्या सोबत आलेले आजी, आजोबा, नातेवाईकांची ताटातूट व्हायची. मुलामुलींसोबत आलेले नातेवाईक दुसर्‍यास बाजूला जायचे. परिणामी, मुलेमुली रडत बसायचे. ही मुलेमुली सतर्कतेमुळे पोलिसांच्या निदर्शनास यायची. पाच दिवसांच्या असलेल्या या सोहळ्यात दररोज सुमारे १० ते १२ मुली हरविल्याची नोंद पोलीस मदत कक्षात करण्यात आली आहे.

- Advertisement -

अनेक मुले फक्त पूर्ण नाव न सांगता स्वत:चे नाव सांगायची, सांगितलेल्या नावांवरुन, काहींच्या पत्त्यांवरुन, तर काहींना थेट शालेय माहितीवरुन पालकांपर्यंत पोहोचविण्याचा तपास पोलिसांनी त्याच दिवशी पूर्ण केला. या सर्व घटनांवर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांची पथके लक्ष ठेवून होती. यापूर्वी अकोला जिल्ह्यात शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचा बंदोबस्त करण्याचा अनुभव तत्कालीन पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्याकडे होता. त्यातूनच मुलेमुली हरविण्याच्या प्रकाराबाबत पथके पहिल्या दिवसापासूनच सजग व तत्पर असल्याचे जाणवले. विशेष म्हणजे, शिवमहापुराण कथा सोहळ्यादरम्यान व नंतर एकही मुलगा-मुलगी त्या ठिकाणाहून बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी नाही. पोलिसांपर्यंत पोहोचलेले सर्वजण त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहोचविण्याचे कर्तव्य पथकांनी त्याच दिवशी पूर्ण केले.

गर्दीत हरवला चिमुकला पण वडिलांचा मोबाईल क्रमांक होता तोंडपाठ

शिवमहापुराण सोहळ्यात गर्दीमध्ये चार वर्षीय चिमुकल्याची आणि त्याच्या आईची ताटातूट झाली. गर्दीमध्ये एकटा चिमुकला दिसताच पोलिसांनी त्याला पोलीस मदत केंद्रामध्ये आणले. पोलिसांनी ताच्या आपलेपणाने संवाद साधत बोलते करण्याचा प्रयत्न केला. आई, वडील व नातेवाईक सोबत नसल्याने आणि अनोळखी माणसे, पोलीस समोर असल्याने भयभीत झालेला चिमुकला फक्त स्वत:चे नाव सांगायचा. पोलिसांनी त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्याने वडिलांचा मोबाईल क्रमांक तोंडपाठ असल्याचे सांगत क्रमांक सांगितले. त्यानुसर पोलिसांनी चिमुकल्याच्या वडिलांशी संपर्क साधत मुलगा गर्दी हरवला होता पण तो सुखरूप असून, शिवमहापुराण सोहळ्यात आलेल्या नातेवाईकांना पोलीस मदत केंद्रात येण्यास सांगा, असे सांगितले. त्यानुसार चिमुकल्याची आई पोलीस मदत केंद्रात आली. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी चिमुकल्याला आईच्या स्वाधीन केले.

शाळेच्या नावावरून शोधले पालक

शिवमहापुराण सोहळ्यात सिन्नरहून आजीसोबत आलेला पाच वर्षीय मुलगा हरवला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला मदत केंद्रात आणले. पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत नाव व पत्ता विचारला असता तो फक्त शाळेचे नाव सांगायचा. त्यावरुन पोलिसांनी सिन्नरच्या शाळेशी संपर्क साधला. शालेय प्रशासनाकडून मुलाच्या वडिलांचा क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्यांना कॉल केल्यावर मुलगा आजीसोबत शिवमहापुराण कथा सोहळ्यात आल्याचे समजले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी आजीशी मोबाईलव्दारे संपर्क साधला. बोलणे पूर्ण होताच आजी पोलीस मदत केंद्रात आली. नातवाला पाहताच आजीला आनंदाश्रू आले. नातवाला जवळ घेत तिने पोलिसांचे मनोमन आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -