महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष; संजय राऊत म्हणातात, निकाल आमच्या बाजूने…

संग्रहित छायाचित्र

 

मुंबईः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालावरुन अनेक दावे प्रतिदावे सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र या निकालावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही असं नाही म्हणणार की निकाल आमच्या बाजूने लागणार आहे. हा देशाचा निकाल आहे. या देशाच्या स्वातंत्र्याचा, राज्य घटनेचा उद्या विजय होईल, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

न्यायपालिकेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जर निकाल कायद्याला अनुसरुन आला नाही तर आपली अवस्था पाकिस्तानप्रमाणे होईल. सद्या जे पाकिस्तानात सुरु आहे. तेच आपल्याकडे सुरु होईल. पाकिस्तानात कायद्याची तोडमोड होत आहे. विरोधकांना अटक केली जात आहे. तशीच परिस्थिती भारतात निर्माण होईल, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली.

या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हेही स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. उद्याचा निकाल हा संविधान सुरक्षित आहे की नाही हे ठरवणारा आहे. न्यायपालिकेवर दबाव असल्यास नक्कीच निकाल चुकीचा लागेल, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

सत्ताधारी म्हणत आहेत की निकाल त्यांच्या बाजूने लागेल या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, असा दावा ते करत असतील तर त्यांनी नक्कीच गडबड केली आहे. विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कायदेतज्ज्ञ आहेत. मात्र त्यांच्या आधी नरहरी झिरवाळ हे विधानसभा उपाध्यक्ष आहेत. त्यांनाही कायद्याचे ज्ञान आहे. त्यांनीही एक निर्णय घेतला आहे. तो निर्णय चुकीचा आहे की नाही हे उद्या न्यायालय ठरवेल. त्यामुळे येत्या काही तासांतच सर्व चित्र स्पष्ट होईल, असे संजय राऊत यांनी सांगतिले.

कायदा आता सर्वांना थोडा फार तरी कळतो. परिणामी काय चुकीचे आणि काय बरोबर हे लवकरच सर्वांना कळेल. सत्ताधारी म्हणत असतील त्यांच्या बाजूने निकाल लागेल. आम्ही असं अजिबात म्हणणार नाही की निकाल आमच्या बाजूने लागेल. निकाल संविधानाच्या बाजूने लागणार आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.