Assembly election : कोरोनाच्या संकट असताना कोणाला तरी निवडणूक घेण्याची घाई, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर परर्रिकर यांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.

shivsena sanjay raut announce 12 seats in uttar pradesh election 2022
शिवसेना यूपीत पहिल्या टप्प्यात 'या' १२ जागांवर उमेदवार देणार, संजय राऊतांची घोषणा

देशातील पाच राज्यांमध्ये निवडणूकांची घोषणा करण्यात आली आहे. देशात कोरोना परिस्थिती बिघडत असताना या निवडणुका घेण्यात येत आहे. निवडणुका घेण्याची कोणालातरी घाई लागली असल्याची खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर केली आहे. संजय राऊत यांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने जे नियम लागू केले आहेत ते भाजपमधील सर्वोच्च नेत्यांनाही स्पष्ट सांगावे असा टोला राऊतांनी लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, उत्तरप्रदेशमध्ये रुग्णांची नोंद होत नसल्यामुळे भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. निवडणूक आयोगाने आरोग्य विभागासोबत चर्चा केली असल्याचे सांगितले आहे. पण हा पर्याय नाही. त्यांनी निवडणुका घटनेनुसार वेळेत जाहीर केल्या आहेत. परंतु लोकांच्या आयुष्याचा विचार केला नाही. निवडणुका पुढे ढकलता येऊ शकतात मात्र तसे केले नाही. कोणाला तरी निवडणुका लवकर घेण्याची घाई झाली आहे. उत्तरेकडील ४ राज्यांची कोरोना परिस्थिती चांगली नाही. आयोगाने निर्बंध घातले आहेत हे कागदावर ठीक आहेत. परंतु त्यांनी स्पष्ट आदेश पंतप्रधान, भाजपचे अध्यक्ष यांनाही द्यावे असा घणाघात राऊतांनी केला आहे.

उत्पल परर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी

दादरा नगर हवेलीमध्ये लोकसभा निवडणूक जिंकलो आहोत. दिवंगत मोहन डेलकर यांचे कुटुंब शिवसेनेत आले आणि आम्ही ताकद लावून निवडणूक लढलो. जर गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर परर्रिकर यांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. त्यांच्या वडिलांनी गोव्यात भाजपला स्थान निर्माण करुन दिले आहे. गोव्यात भाजप पक्ष रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रतिमेवर भाजप गोव्यात टीकला आहे नाहीतर आयाराम गयारामांवर पक्ष टीकला होता. पण उत्पल पर्रिकरांना धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतील. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. भाजपला मुख्य पर्याय म्हणून शिवसेनेकडे पाहतील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जमिनीवर ४ हात चालत आहेत त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी आणि अन्य स्थानिक पक्षांसोबत निवडणुका लढवणार

आम्हाला असं वाटत की, गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रयोग करावा, महाराष्ट्रात जसे निवडणूकांनंतर आघाडी करण्यात आली तशीच गोव्यात निवडणुकांपूर्वी करण्यात यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेलसुद्धा प्रयत्न करत होते. काँग्रेसला वाटत आहे की, ते गोव्यात सत्ता आणू शकतात यामुळे त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील. आम्हालाही काही जागा ऑफर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहे त्यामुळे एकत्र निर्णय घेतला पाहिजे. शिवसेना साधारण ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि अन्य स्थानिक पक्षांसोबत निवडणुका लढवणार. उत्तर प्रदेशमध्येही निवडणूक लढवणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा : भाजपमध्ये असताना चांगला अन् राष्ट्रवादीत गेल्यावर १ वर्षात ईडी लावता, एकनाथ खडसेंचा खोचक सवाल