घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसतीश खरे पुन्हा अटकेत, आदर्श घोटाळा दडपल्याचा ठपका

सतीश खरे पुन्हा अटकेत, आदर्श घोटाळा दडपल्याचा ठपका

Subscribe

नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा (Adarsh ​​Civil Cooperative Credit Union Scam) दडपणार्‍या तात्कालीन जिल्हा उपनिबंधक (satish Khare) सतीश खरे (वय ५७) याला संभाजीनगर पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. न्यायालयाने त्याला ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात ही अटक झाली असून, आदर्श पतसंस्थेविरोधात २०२ कोटी २४ लाख ६३ हजार ९६० रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. आदर्श पतसंस्थेतील घोटाळा सात वर्षांपूर्वीच उघडकीस आला असता तर हजारो नागरिकांचे पैसे वाचले असते. मात्र, तीन वर्षांचे ऑडिट लपवून या घोटाळ्यावर पांघरूण घातल्याच्या आरोपावरून खरेला छत्रपती संभाजीनगरातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

आदर्श घोटाळ्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केलेली आहे. सध्या विशेष तपास पथकाच्या माध्यमातून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. खरेला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते. चौकशीदरम्यान त्याच्यावरील संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याला नाशिकमधून अटक केली. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०२ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी संचालकासह ५० जणांवर गुन्हा दाखल केला. घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अंबादास मानकापे हर्सूल कारागृहात आहे. पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये अनियमितता आढळली असतानाही खरेने कारवाई केली नाही. २०१६ ते २०१८ या कालावधीत घोटाळ्यात सहभागी असल्यावरून खरेला पोलिसांनी अटक केली. खरे हा २०१६ ते २०१८ या कालावधीत छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा उपनिबंधक होता.

- Advertisement -

त्यावेळी आदर्श नागरी पतसंस्थेच्या शाखांमधून विनातारण कर्ज वितरित केले होते. त्यानंतर ३ ऑडिटरच्या माध्यमातून पतसंस्थेचे ऑडिट केले होते. त्या लेखापरीक्षणाचा विशेष अहवाल निबंधक कार्यालयात सादर करणे अपेक्षित होते. ते लेखा परीक्षकांनी केले नाही. विशेष म्हणजे, या लेखापरीक्षकांवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, खरे याने ऑडिटर व पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांवर कारवाई न केल्याने हा घोटाळा झाला.

दरम्यान, नामदेव कचकुरे व सुनील मानकापे यांना न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा पोलीस कोठडीत पाठवले. वनिता मानकापे व सुनंदा मानकापेंचा जामीन अर्ज फेटाळला. पुढील तपास विशेष तपास पथकाचे पोलीस निरीक्षक एस. बी. पवार व त्यांचे सहकारी करत आहेत. तक्रारदारांनी त्यांचे तक्रार अर्ज व त्यासोबत पतसंस्थेची एफडी, बचतखाते, आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रती जोडून अर्ज संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयातील आवक-जावक शाखेत जमा करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतेच ठेवीदारांना सोबत घेत सहनिबंधक कार्यालयातील दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी थाळीनाद आंदोलन केले होते.

- Advertisement -

तपास सीआयडीकडे

आदर्श नागरी पतसंस्थेत २०२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांनी आंदोलन करून मोर्चे काढले. विधीमंडळात हा मुद्दा गाजल्याने हे प्रकरण आता सीआयडीकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दृष्टीक्षेपात 

  • दोन महिन्यांपूर्वी घोटाळा आला उघडकीस
  • २०२ कोटी रुपयांचा घोटाळा
  • ११ संशयित आरोपी अटकेत
  • ३६ ठिकाणची मालमत्ता जप्त
  • ३९ हजार ठेवीदार
  • ६ जणांचा एसआयटीकडून तपास सुरु
  • २ हजार तक्रारी १०० हून अधिक
  • आरोपी दोनवेळा ठेवीदारांनी काढला मोर्चा
  • घोटाळ्यात एक जिल्हा उपनिबंधकासह सरकारी अधिकार्‍याचा सहभाग उघड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -