घरमहाराष्ट्रमला नितीन गडकरींची काळजी वाटतेय - शरद पवार

मला नितीन गडकरींची काळजी वाटतेय – शरद पवार

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास नरेंद्र मोदी यांच्याऐवजी नितीन गडकरी हे पंतप्रधानपदी आरूढ होतील, अशा चर्चेने सध्या चांगलाच जोर धरला आहे. अमरावती येथे झालेल्या राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी तशी भविष्यवाणीच केली आहे. एकूणच या चर्चेत खरंच तथ्य आहे का? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारे उत्तर दिले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी सुरू झाली आहे, याबद्दल आपल्याला काय वाटते? असा प्रश्न पवारांना विचारला असता ते म्हणाले की, “नितीन गडकरी हे माझे मित्र आहेत. पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा असेल तर आता मला त्यांची काळजी वाटू लागली आहे”. असे वक्तव्य पवार यांनी केले आहे. पवार यांचे वक्तव्य हे गडकरी यांच्या काळजीपोटी होते की त्यांचा इशारा भलतीकडेच होता? हे आता काळच सांगू शकेल. कारण पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा अन्वयार्थ काही दिवसांनंतर कळतो, असा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणाने पाहिलेला आहे.

- Advertisement -

म्हणून गडकरी पंतप्रधानपदाचे दावेदार

नितीन गडकरी यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, “कुवती पेक्षा अधिकची मी अपेक्षा केलेली नाही. मी पंतप्रधान पदासाठी इच्छूक नाही.” असे स्पष्ट केल्यानंतरही त्यांनी केलेली अनेक वक्तव्ये ही मोदींच्या विरोधात असल्याचे चित्र दिसत होते. मागच्याच आठवड्यात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना ‘आधी घर नीट सांभाळा, मग देश सांभाळा’, असा सल्ला दिला होता. हा सल्ला नेमका कार्यकर्त्यांना होता की कुणा दुसऱ्याला? हे मात्र गुलदस्त्यातच होते. मात्र जाणकारांनी हा मोदींना टोला असल्याचे म्हटले होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही गडकरी आणि राहुल गांधी बराच वेळ गुफ्तगू करताना दिसून आले होते. विरोधकांना पाण्यात पाहणारे मोदी आणि विरोधकांना खुल्या दिलाने स्वीकारणारे गडकरी… अशी तुलना राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. त्यामुळेच गडकरी हे पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात होते.

माझ्या तब्येतीची काळजी करू नका – पवार

“मी माढातून लोकसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर पक्षासमोर हा विषय मांडून त्यावर चर्चा केली जाईल.”, असे वक्तव्य पवारांनी करून एका नव्या विषयाला सुरुवात करुन दिली होती. त्यातच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचे वय झाले असल्यामुळे त्यांनी लोकसभा लढवू नये, असा सल्ला दिला होता. पाटील यांच्या सल्ल्याचा पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “माझे वय झाल्याने मी माढातून निवडणूक लढवू नये, असे सुचवणाऱ्या भाजप नेत्यांनी माझ्या प्रकृतीची काळजी करू नये”, असा टोलाच त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -