दहीहंडीनिमित्ताने शिंदे आणि ठाकरे पुन्हा आमने सामने; वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार?

मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाने अनेक ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून यासाठी जोरदार आतषबाजी सुरू आहे.

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्ष विकोपाला पोहोचत आहे. विधिमंडळातील पावसाळी अधिवेशनात (Rainy Session) विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आता दोन दिवस अधिवेशनाला सुट्टी असली तरीही दहीहंडीच्या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट (Shinde And Thackerya Group) पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. दोघांमध्येही वर्चस्वाची लढाई सुरू असून ठिकठिकाणी बॅनरबाजी, पोस्टरबाजी सुरू आहे. तसेच, मोठ-मोठ्या बक्षिसांची आमिषं दाखवून गोविंदा पथकांना आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हेही वाचा – मुंबई-ठाण्याच्या रस्त्यांवर गोविंदा पथकांचा जल्लोष; उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित

मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाने अनेक ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून यासाठी जोरदार आतषबाजी सुरू आहे.

आकर्षक बक्षिसे

मुंबई आणि ठाण्यामध्ये दोन्ही गटांनी दहीहंडी कार्यक्रमात विजेत्या संघांसाठी २.५१ लाखांच्या बक्षिसांची घोषणा केली आहे. तर, मनसेनेही आकर्षक बक्षीस ठेवून गोविंदा पथकांना आकर्षक केलं आहे.

हेही वाचा – बक्षिसाचे लोणी चाखायला गोविंदा निघाले शहराबाहेर

विचारे vs शिंदे

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या सन्मानाप्रती दहीहंडीचं आयोजन केल्याचं म्हटलं आहे. तर, प्रामाणिकपणा, एकता, संस्कृती आणि हिंदुत्वाचं प्रतिक म्हणून दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे म्हणाले.

ठाण्यात जुगलबंदी

ठाण्यातील टेंभी नाक्यावर शिंदे गटाने दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलंय, तर तिथून अवघ्या २०० मीटर अंतरावर शिवसेनेने हंडी बांधली आहे. त्यामुळे ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमाला चांगलाच राजकीय रंग पाहायला मिळत आहे. ठाण्यातील मानातील हंडी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःहून हजर राहणार आहेत.

भाजपा विरूद्ध शिवसेना 

वरळीतही दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत. जांबोरी मैदानात भाजपाने दहीहंडी कार्यक्रम आयोजित केला आहे तर, श्रीराम मिल चौकात शिवसेनेच्या कार्यक्रमाचा उत्साह दिसून येत आहे. आशिष शेलार आणि आदित्य ठाकरे यांची गेल्या काही दिवसांपासून वरळी गडच्या नावाने जुगलबंदी सुरू आहे. त्यामुळे आता दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघेही आमने सामने ठाकले आहेत.

दादरमध्ये सेनेची निष्ठा हंडी

शिवसेनेचा जनसंपर्क वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या निष्ठा यात्रा काढत आहेत. दरम्यान, आज त्यांनी शिवसेना भवनातच निष्ठा दहीहंडीचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे स्वतः जातीने हजर राहणार आहेत.