‘त्या’ कामांना स्थगिती देत शिंदे गटाचा विरोधी पक्षनेते अजित पवारांना दणका

राज्यातील शिंदे-फडणवीस या नव्या सरकारने विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांना दणका दिला आहे. शिंदे सरकारने 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे.

ajit pawar

राज्यातील शिंदे-फडणवीस या नव्या सरकारने विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांना दणका दिला आहे. शिंदे सरकारने 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात शिंदे सरकार विरुद्ध कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Shinde group gave a blow to Opposition leader Ajit Pawar)

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कामांना शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे, त्यापैकी बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. तसेच, ही कामे मार्च 2022 ते जून 2022 या कालावधीत मंजूर करण्यात आली होती. सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारने विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना लक्ष्य केल्याचे दिसते. कारण शिंदे सरकारने केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर या बंडाचे सर्वे खापर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर फोडले होते. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी दिला जात नसल्याची शिवसेना आमदारांची तक्रार होती. त्यामुळे सत्ता बदल झाल्यानंतर कामांना स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे.

याआधीही शिंदे सरकारने महाविकास आघाडीला दणका दिला होता. 2022-23 या आर्थिक वर्षामधील जिल्हा विकास प्रकल्पांअंतर्गत देण्यात येणारा निधी रोखण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपाच्या सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षामधील जिल्हा विकास प्रकल्पांअंतर्गत देण्यात येणारा निधी रोखला आहे. नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत हा निधी दिला जाणार नसल्याचं शिंदे सरकारनं निश्चित केल्याचं समजते.


हेही वाचा – सोमवारपासून ‘या’ वस्तूंच्या किमतीत होणार वाढ; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका