मोठ्यांच्या वादात लहानांनी तोंड खुपसू नये – उदय सामंत

मोठ्यांच्या वादात लहानांनी तोंड खुपसू नये, असा सल्ला शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आमदार रवी राणा यांना दिला आहे. रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिले.

shiv sena leader Uday Samant slams on MLA Ravi Rana
शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि आमदार रवी राणा

राज्यात सध्या ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रवी राणा यांनी शिवसेनेने फार जास्त ताणू नये असा सल्ला देत शिवसेनेवर टीका केली. त्याचबरोबर  शिवसेनेचे १५ ते २० आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ‘शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी अंकुश ठेवावा’, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी रवी राणा यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.


हेही वाचा – सत्ता स्थापनेवर मी प्रतिक्रिया देणार नाही – देवेंद्र फडणवीस


 

नेमके काय म्हणाले उदय सामंत?

‘रवी राणा माझे चांगले मित्र आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यपालांना ते भेटले त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. पण मोठ्यांच्या वादात लहानांनी तोंड खुपसू नये, एवढाच माझा मित्रत्वाचा सल्ला’, अशा शब्दांत उदय सामंत यांनी रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर संजय राऊतांवर बोलण्याएवढे रवी राणा मोठे नाहीत. संजय राऊतांच्या राजकीय कारकिर्दी एवढं रवी राणांचे वय आहे का? आपण प्रसिद्धीसाठी कोणावर बोलतोय ह्याच भान असलं पाहिजे. संजय राऊत ह्यांच्यावर बोलल्यावर व शिवसेनेवर बोलल्यावर राजकीय मोठे होऊ असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे, असे देखील उदय सामंत म्हणाले.


हेही वाचा – राज्यात पुन्हा निवडणुका होणार?; जयकुमार रावल यांचे संकेत