आजारपणाचा गैरफायदा घेत…; पटोले, थोरातांमधील वादावर राऊतांची प्रतिक्रिया

shiv sena sanjay raut reaction congress leader balasaheb thorat and nana patole controversy

नवी दिल्ली : राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. यावरून काँग्रेसचे दोन बडे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा डाव रंगतोय. नाशिक विधान परिषद पदवीधर मतदार संघातील उमेदवारीवरून या वादाला सुरुवात झाली. या निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही नेत्यांनी आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. यावेळी काँग्रेसवर नाराज अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे, आणि बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर नाना पटोलेंबरोबर प्रत्यक्ष काम करणं अशक्य असल्याचं मत थोरातांनी व्यक्त केलं. यामुळे काँग्रेसमध्ये आता थोरातविरुद्ध पटोले असा वाद रंगतोय. काँग्रेसमधील या अंतर्गत राजकारणावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या थोरातांची बाजू घेत नाना पटोलेंच्या भूमिकेवर टीकास्त्र डागले आहे. संजय राऊत सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी यावर काहीचं बोलणार नाही, पण माणसाच्या किंवा नेत्याच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन कुठल्या पक्षात त्याच्याविरोधात कारवाया करणं अमानुष आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे खूपचं आजारी असताना बंडाच्या नावाखाली जी कारस्थान झाली ते जितकं किळसवान आहे, तसंच इतर कुठल्या पक्षात होत असेल तर ते माणुसकीला धरून नाही, असंही राऊत म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये निष्ठावान काँग्रेस नेते म्हणून कायम आदर आणि प्रेम आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात थोरात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होते. मंत्री होते, उद्धव ठाकरेंचे सहकारी होते. त्यांनी व्यवस्थित पक्ष आणि सरकार चालवण्यास खूप मदत केली. पण हे त्यांचे अंतर्गत विषय आहे. पण बाळासाहेब थोरात काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वात जुने नेते आहेत. पण त्यांच्याबाबत व्यक्तिशहा माझ्या मनात नेहमीच आदर कायम आहे, असही राऊतांनी स्पष्ट केलं. तसेच यावर मी कसं काय बोलू, पण काँग्रेस नेत्यांनी यावर माझं मत घेतलं आहे. अशी माहितीही संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली.

पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, मात्र शिवसेनेशी युती करणारे वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेडही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे, यासाठी दोन्ही पक्षांकडून तयारी सुरु आहे. त्य़ामुळे शिवसेनेच्या मित्र पक्षांकडून आता मविआची कोंडी करण्याची तयारी सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर आता राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक नाही. तर संभाजी ब्रिगेडशी यासंदर्भात बोलून आम्ही चर्चा करू, असं राऊत म्हणाले आहेत.


कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी लढणार निवडणूक, पुण्यात मविआविरुद्ध भाजप