घरताज्या घडामोडीदसऱ्याला शिवाजी पार्क सुने-सुने; कायदा सुव्यवस्थेमुळे पालिका दोघांनाही परवानगी नाकारण्याची शक्यता

दसऱ्याला शिवाजी पार्क सुने-सुने; कायदा सुव्यवस्थेमुळे पालिका दोघांनाही परवानगी नाकारण्याची शक्यता

Subscribe

महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाने याबाबत विधि खात्याकडून अभिप्राय मागविला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत शिवाजी पार्कचे मैदान दोन्ही गटांना न देता महापालिका या वादातून सुटका करून घेण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी प्रभादेवीत शिवसेनेच्या दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालादसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान नाकारले जाण्याची दाट शक्यता आहे. (Shivaji Park Dussehra due to law and order Both groups are likely to be denied permission)

महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाने याबाबत विधि खात्याकडून अभिप्राय मागविला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत शिवाजी पार्कचे मैदान दोन्ही गटांना न देता महापालिका या वादातून सुटका करून घेण्याची शक्यता आहे. तसे झाले तर यंदा दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क सुने सुने राहील.

- Advertisement -

दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून जोरदार मोर्चेबंधणी सुरू आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी ठिकठिकाणांहून मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर येत. काही महिन्यांपूर्वी शिवसनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडले. या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटाने खरी शिवसेना आपलीच असा दावा करत दसरा मेळावा घेण्याची तयारी चालवली आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर केला आहे. मात्र शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनीही याच कारणासाठी अर्ज करून शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. यावरून उभयतांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन जी-उत्तर विभाग कार्यालयाने या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या विधि खात्याकडून अभिप्राय मागविला आहे. त्यावर अद्याप विधि खात्याने आपला अभिप्राय कळवलेला नाही.

- Advertisement -

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला द्यायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच प्रभादेवी परिसरात बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेचे महेश सावंत यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. एकूण परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाजी पार्कला पर्याय म्हणून शिवसेनेने बीकेसी मैदानाची चाचपणी केली आहे. यंदा दसऱ्याच्या दिवशी बीकेसीचे मैदान मिळावे म्हणून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एमएमएआरडीएला पत्र लिहले आहे.


हेही वाचा – मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले; रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -