घरमहाराष्ट्र'भाजपमध्ये जाताच फाईल बंद कशा?', शिवसेनेचा केंद्रीय तपास यंत्रणांना सवाल

‘भाजपमध्ये जाताच फाईल बंद कशा?’, शिवसेनेचा केंद्रीय तपास यंत्रणांना सवाल

Subscribe

शिवसेनेने (Shivsena) आज ‘सामना’च्या अग्रेलखातून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामकाजावर बोट ठेवलं आहे. जेथे भारतीय जनता पक्षाचे राज्य नाही त्या राज्यांत ईडी  (ED) अधिक सक्रिय होत आहे, हा काय फक्त योगायोग समजायचा? असा सवाल करत ईडी व सीबीआय (CBI) म्हणजे भाजपच्या नव्या शाखाच बनल्याचा आरोप होत आहे व त्यास बळ देणाऱ्या घटना घडत आहेत, अशी टीका देखील शिवसेनेने केली आहे.

“ईडी उत्तर प्रदेशात नाही, बिहारात नाही, आंध्र, तेलंगणा, ओडिशात नाही. गुजरातमध्ये तर नाहीच नाही. मेघालय, आसामात, मध्य प्रदेशात नाही. मग ईडी, सीबीआय कोठे आहे? तर ती महाराष्ट्र, प. बंगाल, झारखंड, छत्तीसगढ, तामीळनाडू अशा बिगर भाजपशासित राज्यांतच आहे! असे का? यावरही एकदा सर्वोच्च न्यायालयाने झोत टाकावा!” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

- Advertisement -

विरोधकांना नामोहरम करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर

“राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होतोय. या संस्था व यंत्रणा सरकारच्या ‘अंगवस्त्र’ बनण्यास तयार आहेत व अनेकदा त्यांनी तसे कृतीतून दाखवूनच दिले आहे. त्यामुळे सीबीआय, ईडीवर न्यायालयाने मारलेले ताशेरे एक प्रकारे लोकभावनाच आहे. आज जो उठतोय तो सीबीआय चौकशीची मागणी करतोय आणि सीबीआयही मालकांच्या हुकूमाची वाट पाहत बसलेलीच आहे. काल महाराष्ट्रात एका केंद्रीय मंत्र्यावर धमकी प्रकरणात कारवाई झाली. न्यायालयाने ही कारवाई योग्यच ठरविली. तरीही या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी उठू लागली. सीबीआयचे महत्त्व होते तेच नष्ट होऊ लागले आहे,” असं शिवसेनेने ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.

भाजपमध्ये जाताच ‘फाईल’ बंद! हा काय प्रकार आहे?

“केंद्रीय तपास यंत्रणांचा कारभार निःपक्षपाती नाही. बऱयाच फायली तयार केल्या जातात व राजकीय सायबांच्या हुकमानुसार त्यावर कारवाया होतात. काही फायलींचा वापर हा दाब-दबावासाठीच होतो. याच फायलींचा उपयोग करून आमदार-खासदारांची पक्षांतरे घडविली जातात. महाराष्ट्रात ईडीचा ससेमिरा टाळण्यासाठी काही पुढारी भाजपमध्ये गेले व थेट केंद्रात मंत्रीच झाले. भाजपमध्ये जाताच ‘फाईल’ बंद! हा काय प्रकार आहे? जेथे भारतीय जनता पक्षाचे राज्य नाही त्या राज्यांत ईडी अधिक सक्रिय होत आहे, हा काय फक्त योगायोग समजायचा?” असा सवाल शिवसेनेने केला आहे.

- Advertisement -

राजकारणातील भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे कोणी?

“ईडीचे एक वरिष्ठ अधिकारी लवकरच म्हणे भारतीय जनता पक्षात सामील होऊन त्यांचे कार्य पुढे नेणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे महाशय ईडीचे सहसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या तपासाची सूत्रे सांभाळली आहेत. आता म्हणे ते उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक लढवून आमदार व मंत्री होतील. ईडीचे हे राजकीय कनेक्शन काय सांगते? न्यायमूर्ती भाजपमध्ये जातात. पोलीस, सीबीआयवाले राजकारणात जातात व या अधिकाऱ्यांना त्यांनी आधी बजावलेल्या सेवेबद्दल चोख इनाम दिले जाते. त्यामुळे राजकारणातील भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे कोणी?,” असा सवाल शिवसेनेने केला आहे.

“शिवसेनेचे प्रताप सरनाईक असतील किंवा एकनाथ खडसे. त्यांच्याबाबतची प्रकरणे ईडी जितकी गांभीर्याने घेत आहे तितकी इतरांची का घेत नाही? भाजपचे एक आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबियांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ठेकेदारीत शेकडो कोटींचा अपहार केल्याची तक्रार ईडीकडे आहेच, पण सरनाईक, अविनाश भोसले यांच्याप्रमाणे ‘भाजप लाडां’च्या संपत्तीवर ईडीने कब्जा केलेला दिसत नाही,” असा सवाल सेनेने केला आहे.

भाजपच्या कुशीत व उशीत शिरून शिवसेनेवर हल्ला करतायत

“ईडीपासून मुक्तता मिळावी म्हणूनच ही ‘राष्ट्रभक्त’ मंडळी भाजपच्या कुशीत व उशीत शिरून शिवसेनेवर हल्ला करीत आहेत,” अशी टीका शिवसेनेने केली आहे. “सध्या सार्वजनिक मालमत्तांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. राहुल गांधी यांनी त्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधींचे आरोप हीच ‘एफआयआर’ मानून ईडीने कारवाई केली तर राष्ट्रसेवेचे पुण्यच त्यांच्या पदरी पडेल,” असा सल्ला देखील शिवसेनेने दिला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -