देशभक्ती व्यक्त करणाऱ्या शब्दाला विरोध नाही, सुधीर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण

हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणायचे अशा आशयाचे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्यावर देशभक्ती व्यक्त करणाऱ्या शब्दाला विरोध नाही, असे स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.  

sudhir mungantiwar

राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणायचे अशा आशयाचे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्यांच्या विधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी याला विरोध केला. रझा अकादमीने यावर तीव्र आक्षेप घेतला होता. वाढत्या विरोधानंतर सुधीर मुनगंटीवार आपण हॅलोऐवजी केवळ वंदे मातरम् हाच शब्द वापरा, असे म्हटले नासल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

देशभक्ती व्यक्त करणारा शब्द असेल तर आमचा विरोध नाही –

मुनगंटीवार यांनी रझा अकादमीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इंग्रजांनी किंवा विदेशातून आलेल्या हॅलो शब्दाऐवजी वंदे मातरम् शब्द वापरावा, हे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाचे सुरू केलेले अभियान आहे. एखादा व्यक्ती वंदे मातरम् च्या तोडीचा शब्द वापरत असेल किंवा राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा शब्द वापरत असेल, तर त्याला आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही.

असा कोणताही कायदा केला नाही –

हॅलो शब्द जर रझा अकादमीसाठी देशभक्तीची प्रेरणा देणारा असेल, तर प्रश्न उपस्थित नाही होत. शेवटी असा कोणताही कायदा केला नाही. आम्ही १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी दरम्यान सर्व देशभक्तांच्या माध्यमातून हे अभियान सुरू करत आहोत. वंदे मातरम् हे स्वातंत्र्यवीरांच्या ओठांवरचा पवित्र शब्द आहे. एका कवीने फार छान लिहिले आहे, देवाच्या मुखातून निघालेल्या वेद मंत्रापेक्षा स्वातंत्र्यवीरांच्या तोंडून निघालेला वंदे मातरम् हा शब्द आमच्यासाठी प्राणप्रिय आणि पवित्र आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.