घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांच्या नावाने आधारतीर्थची 'संशयास्पद' वाटचाल

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांच्या नावाने आधारतीर्थची ‘संशयास्पद’ वाटचाल

Subscribe

नाशिक : आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचा पुढील शिक्षणाचा प्रवाह अव्याहतपणे सुरु रहावा, इतक्या उदात्त हेतूने सुरु झालेल्या आधारतीर्थ आश्रमाची वाटचाल कालांतराने संशयास्पद होत गेली. या आश्रमात नक्की किती आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे मुले आहेत, याबाबतही साशंकता वर्तवण्यात येते. इतकेच नाही तर येथे राहणार्‍या मुलांची कमालीची पिळवणूक केली जाते, अशा तक्रारीही यापूर्वी प्राप्त झाल्या आहेत.

त्र्यंबकरोडवरील आधारतीर्थ आश्रमात चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची बाब मंगळवारी पुढे येताच आश्रमाच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. आत्महत्या ग्रस्त मुलांना आसरा देण्याच्या संवेदनशील मुद्यामुळे या आश्रमासाठी मदत करणारे असंख्य आहेत. परंतु मुलांची एकूण संख्या आणि आश्रमासाठी येणारी मदत लक्षात घेता मदतीचे उर्वरित साहित्य कोठे जाते? मदतीच्या रुपात जीवनावश्यक बहुतांश वस्तू आणि पदार्थ आश्रमाला मिळत असतांना मिळणार्‍या देणग्यांचे काय केले जाते असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबातील पिडीत मुलांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. परंतु सगळीच मुले अशा शेतकर्‍यांची आहे अशी दिशाभूल करणारी माहिती देऊन दानशुरांची फसवणूक केली जाते अशी तक्रार या आश्रमातीलच एका विद्यार्थ्याने माध्यमांसमोर केली होती. या आश्रमातील विद्यार्थी अन्यत्र कुठलाही रहिवासी असला तरी त्याला बिड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील आपण आहोत, असे सांगायला लावले जात असल्याचेही या विद्यार्थ्याने नमूद केले होते.

- Advertisement -

विद्यार्थ्याचा पालक व्यसनामुळे, अपघातामुळे वा अन्य कारणाने मृत झालेला असले तरी आपण आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचेच मुलं आहोत, असे सांगायला लावण्यात येते. त्यातून अपसूकच देणगीदाराच्या मनात अधिक सहानुभूती निर्माण होते. इतकेच नाही तर, देणगी वा मदत देण्यास आलेल्यांसमोर विद्यार्थ्यांना विविध कलांचे सादरीकरण करण्याची सक्ती केली जाते. भजन, नृत्य यांसारखी कला सादर करण्याची सक्ती करतांना मुलांची शाळा बुडाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. मुलांकडून जड कामे करुन घेण्यास मज्जाव असतांना मुलांकडून विटा उचलण्यासारखी कामे करुन घेतली जातात. अतिशय संवेदनशील विषयावर हा आश्रम काम करीत असल्याचे भासवले जात असल्याने या आश्रमासंबंधिच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जात होते. परंतु चार वर्षाच्या निरागस चिमुरड्याची हत्या झाल्याची बाब पुढे आल्यानंतर या आश्रमात ‘काळेबेरे’ होत असल्याच्या संशयाला बळकटी मिळते. शासनाने या आश्रमाची चौकशी करुन त्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. यासंदर्भात बाजू जाणून घेण्यासाठी आधर तिर्थचे त्र्यंबक गायकवाड यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -