छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची दिल्लीने स्पर्धा ठेवली का? संजय राऊतांचा भाजपाला सवाल

मी नाशिक दौऱ्यावर जाणार असून, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझा हा पहिलाच दौरा आहे. नाशिक उत्तर महाराष्ट्रात आता जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्यावरही जाणार आहे. उद्या नाशिक, नांदेड यांसह अनेक ठिकाणच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या या दौऱ्यात भेट घेणार आहे.

sanjay raut

सध्याचे जे खोके सरकार आहे, संपूर्ण देशभरात खोके सरकार म्हणून ओळखले जाते. त्या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची स्पर्धा रंगली आहे का? दिल्लीने स्पर्धा ठेवली आहे, कौन बनेगा करोडपती सारखी, की कोण जास्त छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार? रोज एक भाजपाचा मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोय, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams Eknath Shinde and BJP Mangal Prabhat Lodha)

गुरूवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधतना संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “मी नाशिक दौऱ्यावर जाणार असून, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझा हा पहिलाच दौरा आहे. नाशिक उत्तर महाराष्ट्रात आता जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्यावरही जाणार आहे. उद्या नाशिक, नांदेड यांसह अनेक ठिकाणच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या या दौऱ्यात भेट घेणार आहे”

“संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे, भास्कर जाधव आणि विनायक राऊत फिरत आहेत. या प्रत्येक नेत्याच्या दौऱ्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुळ शिवसेना ही जागेवरच आहे. आमचे ४० खोके आमदार जरी गेले असले तर शिवसैनिक आमच्या पाठिशी आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

“या सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्ये म्हणजेच मंत्री असो वा राज्यपाल या लोकांमध्ये एक स्पर्धा रंगली आहे. कोण जास्त छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार, अशी स्पर्धा या लोकांमध्ये रंगली आहे. त्यामध्ये या सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढाही आहेत. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असाल, पण एक लक्षात घ्या जनता डोळे बंद करून बसलेली नाही. सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता लवकरच उत्तर देईल”, असेही राऊत म्हणाले.

“मंगल प्रभात लोढा हे महाराष्ट्राचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आहेत. एक उद्योजक आहेत आणि पर्यटन मंत्री आहेत. निधान या राज्याच्या पर्यटन मंत्र्यांना तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहीत असायला हवा. कारण जगभरातून जे पर्यटक महाराष्ट्रात येतात, ते महाराजांचे किल्ले आणि त्यांचा इतिहास पाहण्यासाठी येत असतात. तसेच, आग्राला जे पर्यटक जातात ते शिवाजी महाराजांचा तिकडचा संघर्ष समजून घेण्यासाछी जात असतात. अशावेळेला महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात चुकीचे विधान करून त्याची तुलना एका पक्षाशी, राज्याशी बेईमान करणाऱ्या व्यक्तीबरोबर करतात. छत्रपती शिवाजी महाराज काय बेईमान होते काय?”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना फटकारले.

“जसे भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने सुदांशू त्रिवेदी यांना माफीवीर ठरवलं. राज्यपालांनी शिवाजी महाराज हे नायक नाहीत, जूने झाले सांगितलं आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांची एका बेईमान व्यक्तीशी तुलना करून महाराष्ट्राचा अपमान केला. सध्याचे जे खोके सरकार आहे, संपूर्ण देशभरात खोके सरकार म्हणून ओळखले जाते. त्या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची स्पर्धा रंगली आहे का, दिल्लीने स्पर्धा ठेवली आहे कौन बनेगा करोडपती सारखी, की कोण जास्त छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार, रोज एक भाजपाचा मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोय”, अशी टीका राऊतांनी भाजपावर केली.


हेही वाचा – उद्धव ठाकरे महिला नेत्याला देणार मुख्यमंत्रीपदाची धुरा? चर्चेला उधाण