घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिवसेनेच्या निष्ठावंतांनी पळ काढत घरची पार इज्जत काढली, मग काँग्रेस कशी मागे...

शिवसेनेच्या निष्ठावंतांनी पळ काढत घरची पार इज्जत काढली, मग काँग्रेस कशी मागे राहील : डॉ. हेमलता पाटील

Subscribe

नाशिक : विधानपरिषद निवडणुकांमध्ये सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेस अंतर्गत वादाला तोंड फुटले असून गेल्या अनेक दिवसांपासून मौन धारण केलेले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आता थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात हायकमांडकडे तक्रार केल्याने दोन दिग्गज नेत्यांमधील वाद चव्हाटयावर आल्याने शिवसेनेप्रमाणेच आता काँगेेसचेही नानांची काँग्रेस आणि थोरातांची काँग्रेस असे दोन गट पडतात की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी केलेले व्टिट चांगलेच चर्चेत आले आहे. स्वतःला निष्ठावंत म्हणवून घेणार्‍या निष्ठावंतांनी शिवसेनेतून पळ काढत घरची पार इज्जत काढली मग काँग्रेस कशी मागे राहील असे व्टिट करत एकप्रकारे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाहीररित्या व्यक्त केल्याचे यातून दिसून येते.

नाशिक विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीवरून आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थोरात, तांबे यांना काँग्रेस मधून ढकलण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. थोरात यांनीही पटोले यांच्यासोबत कसं काम करायचे ? असा सवाल उपस्थित करत हायकमांडकडे तक्रार केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये या निवडणुकी दरम्यान ज्या घडामोडी घडल्या ते पाहता महाराष्ट्र काँगेंसमध्ये दोन गट पडले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. थोरातच नव्हे तर विदर्भातील काही नेत्यानींनी पटोलेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

काँग्रेसमध्ये सध्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोन दिग्गजांचे गट आहेत. नाना पटोलेही आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वरिष्ठ नेत्यांमधील या गटबाजीमुळे स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहे. त्यातच नाशिक येथील काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी सोशल मिडीयावर केलेले व्टिटही चर्चेत आले आहे. ताई आपण बाळासाहेबांच्या काँग्रेसचे काम करायचे की नानांच्या काँग्रेसचे ? असा सवाल करत डॉ. पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांनाही या माध्यमातून वाट मोकळी करून दिली आहे. अर्थात काँग्रेस अंतर्गत हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून धुमसत आहे मात्र तांबेंच्या निमित्ताने आता यावर जाहीर वाच्यताही होऊ लागल्याने काँग्रेसमध्ये गटबाजी वाढत असल्याचेच दिसून येते. सहा महिन्यांपूर्वीच शिवसेनेतील काही आमदारांनी बंड पुकारात दुसरा गट स्थापन केला मग काँग्रेस कशी मागे राहील असा सवाल उपस्थित करत एकप्रकारे शिवसेनेच्याच धर्तीवर काँग्रेसचेही दोन गट तयार होतील की काय अशी भीतीही या व्टिटच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -