घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रथोरातांनी माझे बिन टाक्याचे ऑपरेशन केले : डॉ. शेवाळे

थोरातांनी माझे बिन टाक्याचे ऑपरेशन केले : डॉ. शेवाळे

Subscribe

मी सर्जन असल्याने भूल देऊन ऑपरेशन करतो. मात्र, थोरात हे हसून न बोलता केवळ ऑपरेशन करतात. ते हसले की समजायचे काहीतरी गडबड आहे. त्यांनी माझे बिनटाक्याचे ऑपरेशन केले; पण मला समजले नाही, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी लगावला. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
धुळे मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर डॉ. शेवाळे यांनी काँग्रेसचे मंत्री, बाळासाहेब थोरात यांच्या समक्ष काँग्रेस कमिटीत आपली खदखद व्यक्त केली. ते म्हणाले, यंदा धुळ्यासाठी दिलेल्या उमेदवाराचा राजकीय वारसा बघण्यात आला; मात्र काम करणार्‍या उमेदवाराकडे लक्ष दिलेले नाही. गेल्या १५ वर्षांपासून धुळ्यासह बालगाण, मालेगाव व मालेगाव शहरामध्ये काम केले आहे. मी लोकांच्या मनामध्ये आहे पण नेत्यांच्या मनामध्ये नाही. त्यामुळे तिकीट मिळालेले नाही. बागलाण व मालेगावमधील उमेदवार दिला तर पक्षाला विजय नक्की मिळेल.

मात्र, आजपर्यंत तसे झालेले नाही, ही मोठी खंत आहे. आमच्याकडे दोन पैसे कमी असतील पण आम्ही लोकांच्या हृदयात आहोत. आम्ही पदासाठी भुकलो नाही. लोकांसाठी काम करणे महत्वाचे आहे. कोणीही कोणत्याही पदावर कायमस्वरुपी बसू नये. नाराजी व्यक्त करण्याची संधी मिळाल्याने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक जिल्ह्याचा पाच वर्षे अध्यक्ष राहिलो असलो तरी सुरूवात धुळे जिल्हाध्यक्ष म्हणून झाली आहे. धुळ्यातून तिकीट मागितले असता नाशिकचे जिल्हाध्यक्ष केले होते. पुन्हा उमेदवारी मागितली पण मिळाली नाही. नूतन जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवालांच्या आमदारकीचा साक्षीदार व भागीदार आहे. राजकारणात हार-जीत होत असते. मात्र, संधी मिळणे महत्वाचे असते, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

विलासराव हयात असल्यापासून तयारी

डॉ. तुषार शेवाळे म्हणाले की, धुळे लोकसभेची पुनर्रचना झाल्यापासून इच्छुक उमेदवार म्हणून काम करत होतो. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे घरी आले होते. त्यांनी लोकसभेची तयारी करण्यास सांगितले. तेंव्हापासून तयारी केली. मात्र, तिकीट कधीच मिळाले नाही. तिकीट मिळाले असते तर विजयी झालो असतो. तिकीट न मिळाल्याने समीकरण बदलले. दुसर्‍यावेळीही तिकीट मिळाले नाही. तिसर्‍यावेळी काँग्रेसच्या विजयासाठी वरिष्ठांना नाशिकमधील उमेदवार धुळे लोकसभेसाठी द्यावा, तरच समीकरण बदलेल, असे सांगितले. कारण मते थांबवणारा कोणीतरी पाहिजे. मते थांबली नाहीतर तर भाजपचा उमेदवार विजयी होईल, असेही सांगितले होते. परिणामी, धुळ्यामध्ये भाजपचा उमेदवार तीनवेळा निवडून आला.

बळजबरीने मालेगावचे तिकीट दिले

मागील विधानसभेच्या निवडणुकीत मालेगावच्या जागेसाठी तयारी केलेली नसतानाही बळजबरीने तिकीट देण्यात आले होते. निवडणुकीची तयारी किमान चार महिने करणे आवश्यक होते पण तो कालावधी मिळाला नाही. अवघ्या २१ दिवस निवडणूक तयारी केली होती. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी रिपोर्ट चांगला असून, उमेदवारी करण्यास सांगितले होते. कारण राष्ट्रवादीचा उमेदवार मिळत नाही, असे सांगत तत्कालीन प्रांताध्यक्ष थोरातांशी बोलून घेईल, असेही पवार म्हणाले होते. अशा पद्धतीने बळजबरीने माळ माझ्या गळ्यात घालण्यात आली. त्यामुळे उमेदवारी करावी लागली. वेळ आणि नियोजन कमी पडले. तरीही, मागील काँग्रेसच्या उमेदवाराला ५ हजार मते मिळाली होती. माझ्यावेळी तब्बल ७४ हजार मते मिळाली होती. आधी वेळ दिला असता, सांगितले गेले असते आणि शक्ती दिली असती तर निश्चितच विरोधी उमेदवाराचा पराभव केला असता, असेही डॉ. शेवाळेंनी नमूद केले.

- Advertisement -

प्रचार करायचा की नाही, ते प्रतिसादावर अवलंबून

उमेदवार किती लोकांच्या हृदयापर्यंत काम करतात हे पाहणे महत्वाचे आहे. माझ्या नशीबाने तिकीट कापले गेले आहे. काँग्रेसचे उमेदवार लोकांसमोर किती उत्साहाने सामोरे जातात, त्यांनाही लोकांचा किती प्रतिसाद मिळतो, त्याच्यावर भविष्य अवलंबून आहे. उद्या एखाद्या उमेदवाराचा प्रचार करायला गेलो आणि लोक म्हणू लागले की, हे कधी लोकांच्या कामाला आले नाहीत तर त्या उमेदवाराचा कशा पद्धतीने प्रचार करायचा? उमेदवाराच संपर्क किती आहे, त्याचा उत्साह किती आहे, त्यावर आमचा प्रतिसाद अवलंबून असेल, असेही डॉ. तुषार शेवाळे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -