Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आता काही क्षणांतच...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आता काही क्षणांतच…

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असे कायेदतज्ज्ञांचे मत आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असे कायेदतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. लवकरच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांचे घटनापीठ निकाल वाचन सुरु करणार आहेत. काल आजच्या कामकाजाचा बोर्ड सर्वोच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. दिल्लीतील एका प्रकरणाचा निकाल घटनापीठ आधी देणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल घटनापीठाकडून देण्यात येणार आहे.

 

- Advertisement -

गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे काही आमदारांसह अचानक थेट गुजरातला निघून गेले. ते का निघून गेले. त्याचे कारण काय, याची चर्चा सुरु झाली. अखेर भाजपच्या मदतीने शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याचे स्पष्ट झाले. तेथून शिवसेना फुटीचा प्रवास सुरु झाला. शिवसेनेचा एक एक आमदार शिंदे यांच्या गटात सामील होत होता. त्याचवेळी महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीचा व्हीप जारी करण्यात आला. या बैठकीला एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले 16 बंडखोर आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची नोटीस जारी करण्यात आली. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही नोटीस जारी केली. त्याचदरम्यान 16 बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस जारी केली.

या दोन्ही नोटीसचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला. त्यावर सुनावणी सुरु असतानाच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. तेही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचले. याच गोंधळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले.
- Advertisement -

 

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले तरी सर्वोच्च न्यायालयात वरील सर्व मुद्द्यांची सुनावणी सुरु होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर या सर्व मुद्द्यांवर सुनावणी सुरु होती. नबाब रेबिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार जर विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाची नोटीस बजावण्यात आली असेल तर ते आमदारांवर अपात्रतेची कारवाई करु शकत नाही, असा युक्तिवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला. तर विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेची कारवाई करण्याचे अधिकार आहेत, असा दावा ठाकरे गटाने केला. यासह सत्ता बदल होत असताना झालेल्या घडामोडींचा तपशील न्यायालयासमोर उभयतांनी मांडला. उभयंतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला.

एकनाथ शिंदेंची पक्षांतर बंदी कायद्याला बगल
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करताना पक्षांतर बंदी कायद्याला बगल दिली. पक्षांतर बंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातून दोन तृतीयांशहून अधिक लोकप्रतिनिधी बाहेर पडल्यास त्यांना अन्य पक्षात विलीन व्हावे लागते. मात्र शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडताना आपला गट अन्य पक्षात विलीन केला नाही. या उलट आपला गट हाच मूळ शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांचा दावा मान्य करत त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह दिले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल महत्त्वाचा आहे.

या आमदारांचे भवितव्य आज ठरणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – कोपरी ठाणे
यामिनी जाधव – भायखळा
लता सोनावणे – चोपडा जळगाव
अब्दुल सत्तार – सिल्लोड – कृषी मंत्री
तानाजी सावंत – भूम/परंडा – आरोग्यमंत्री
संदीपान भुमरे – पैठण – रोजगार हमी, फलोत्पादन
भरत गोगावले – महाड
संजय शिरसाट – छ६पती संभाजीनगर (पश्चिम)
प्रकाश सुर्वे – मागाठाणे
बालाजी किणीकर- अंबरनाथ
बालाजी कल्याणकर – नांदेड
अनिल बाबर – खानापूर
संजय रायमुलकर – मेहकर लोणार – नांदेड
रमेश बोरनारे – औरंगाबादच्या वैजापूर
महेश शिंदे – कोरेगावचे
चिमणराव पाटील पारोळा एरंडोल, जळगाव

- Advertisment -