घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचिखल-दलदलीतील रस्त्यामुळे चिमुकल्याचा बळी

चिखल-दलदलीतील रस्त्यामुळे चिमुकल्याचा बळी

Subscribe

लखमापूर ते अंमळनेर रस्त्याची दुर्दशा; मुलाला उपचारासाठी घेऊन जाताना ५ किमी रस्त्यासाठी लागले दीड तास; विलंबामुळे रस्त्यातच मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूर ते अंमळनेर या पाच किलोमीटर अंतराच्या अत्यंत चिखलमय रस्त्यामुळे ११ वर्षीय शाळकरी मुलाला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कृष्णा बाबूलाल परदेशी असे या मृत मुलाचे नाव असून त्याला पोटात वेदना होत असल्याने वडील दवाखान्यात नेत होते. मात्र, या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना त्यांना तब्बल एक तासाहून अधिक वेळ लागल्याने उपचारात दिरंगाईने त्याचा मृत्यू झाला.
कृष्णाचे आई-वडील लखमापूर ते अमळनेर वस्तीवर राहतात. मात्र, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून येथील लखमापूर ते अंमळनेर दरम्यानचा ५ किलोमीटर अंतराचा रस्ता आजही खडीकरणाच्या प्रतिक्षेत आहे.

या रस्त्यावरून हजारो शेतकरी ये-जा करताता. मात्र, रस्त्याच्या दूरवस्थेमुळे ये-जा करणे अतिशय धोकादायक बनले आहे. अशा स्थितीत शाळकरी मुले शाळेत येण्यासही धजावत नसल्याच्या तक्रारी आहेत. सविस्तर माहिती अशी की, कृष्णा हा रात्री झोपल्यानंतर सकाळी 6 वाजेला त्याच्या पोटात प्रचंड दुखू लागले. अचानक त्याला उलटी झाली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी लागलीच त्याला दवाखान्यात नेण्यासाठी दुचाकी काढली. मात्र, दुचाकी या अवघड वाटेने जाणे शक्यच नव्हते. चिखलाच्या दलदलीतून मार्ग काढत हा पाच किमी अंतराचा रस्ता पार करताना त्यांना एक तासाहून अधिक वेळ लागला. तोपर्यंत रस्त्यातच कृष्णा गतप्राण झाला. यामुळे या हतबल पित्यावर आभाळ कोसळलं. मुख्य म्हणजे याच रस्त्याच्या दुर्दशेमुळे आतापर्यंत अनेक घटना घडून अनेक शेतकरी, वयोवृद्धांना तसेच शाळकरी मुलांचा बळी गेल्याची शोकांतिका आहे. मात्र, याचे सोयरसुतक कोणाही लोकप्रतिनिधी वा प्रशासनाला नसल्याने शेतकर्‍यांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

- Advertisement -

1972 सालापासून लखमापूर हे गाव जायकवाडी धरणामुळे पुनर्वसित झालेले गाव आहे. शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या गलीच्छ धोरणामुळे लखमापूर गावातल्या शेतीसाठी प्रमुख असलेल्या तसेच या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांना गरज असतानाही त्याचे काम झालेले नाही. या रस्त्याच्या अशा अवस्थेमुळेच पुन्हा एकदा ही दुर्दैवी घटना घडली.

राज्यकर्त्यांना लाज वाटायला हवी. त्यांचे स्वतःचे लेकरू जाईल, तेव्हाच त्यांच्या लक्षात येईल की हे दुःख काय असतं. म्हणून गोरगरिबांचा तळतळाट घेऊ नका, तुमचे शहरात आलिशान बंगले, डॉक्टर तुमच्या घरी येतो, पण आमचं काय? काळजाला भिडणारी ही घटना असून या रस्त्याचे काम तत्काळ मार्गी न लावल्यास येणार्‍या निवडणुकीवर बहीष्कार टाकण्यात येईल. : अमोल वायसळ, ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते, लखमापूर

वेळेवर उपचार मिळण्यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्यामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे आज एका दहा वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला. सरकारला तसेच लोकप्रतिनिधींना अजून किती बळी द्यावेत, म्हणजे ग्रामीण शेतीवाडीचे वेळेवर रस्ते चांगले होतील. उपचार मिळण्यासाठीची होरपळ थांबेल. : भाऊसाहेब शेळके-पाटील, शेतकरी नेते, प्रहार शेतकरी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -