घरमहाराष्ट्रट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील..., ठाकरे गटाचे जोरदार टीकास्त्र

ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील…, ठाकरे गटाचे जोरदार टीकास्त्र

Subscribe

मुंबई : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मि. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील व त्यांचे ‘सूटबूट’ भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री वगैरे करण्याचे काम करावे. भ्रष्टाचारी फक्त भाजपातच राहतील व त्यांना अभय मिळेल, अशी खरपूस टीका ठाकरे गटाने मोदी सरकारवर केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे सीबीआयला भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात खुली सूट दिली आहे. सीबीआयच्या स्थापनेदिवशी पंतप्रधान मोदी यांनी सीबीआयला सांगितले, ‘ताकदवान भ्रष्टाचाऱ्यांवर न भिता कारवाई करा.’ पंतप्रधानांचे भाषण गांभीर्याने घ्यायचे की टाळ्या वाजवून सोडून द्यायचे? असा प्रश्न त्या सोहळ्यातील उपस्थितांना पडला असेल. ‘देशात आता भ्रष्टाचाराविरोधात कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नाही. कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला वाचवू नका आणि पाठीशीही घालू नका, असे मोदी म्हणत असले तरी सीबीआय म्हणजे मोदी-शहांच्या पिंजऱ्यातला पोपट आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका नसावी, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपावर केली आहे.

- Advertisement -

‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका,’ याचा अर्थ…
एकेकाळी सीबीआय म्हणजे ‘काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. आज काँग्रेसची जागा भाजपने घेतली व सीबीआयचा पोपट पिंजऱ्यातच मालक सांगेल त्याप्रमाणे ‘विटू विटू’ किंवा ‘मिठू मिठू’ करीत आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणा आज मोदींच्या ढवळ्या-पवळ्याप्रमाणेच काम करीत आहेत. मोदी म्हणतात, ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका,’ याचा अर्थ (असा की) जे भाजपात आहेत असे भ्रष्टाचारी किंवा ज्यांनी भाजपात प्रवेश करून गंगास्नान केले असे सोडून बाकी सगळे भ्रष्टाचारी आहेत व सीबीआय-ईडीने त्यांना सोडू नये, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

अदानींवर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का?
जोपर्यंत भाजपकडे भ्रष्टाचार धुऊन काढण्याची वॉशिंग मशीन आहे तोपर्यंत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार मोडून काढू वगैरे भाषा न वापरलेलीच बरी. त्यात त्यांचेच हसे होत आहे. सीबीआयच्या संमेलनात मोदी म्हणाले, ‘भ्रष्टाचार हा घातक आहे. गरीबांचा हक्क मारण्याचे काम भ्रष्टाचार करतो.’ मोदी बरोबर बोलत आहेत, पण स्टेट बँक, एलआयसी वगैरेंच्या पैशांची लूट प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी केली व हा पैसा गरीब जनतेचाच होता. गरीबांचा पैसा लुटल्याबद्दल सीबीआयने तुमच्या अदानीवर काय कारवाई केली? अदानी हे अत्यंत शक्तिमान उद्योगपती आहेत. त्यामुळे सीबीआय त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार नाही. पुन्हा अदानी-मोदी हे बंधुतुल्य नात्याने बांधले गेले आहेत. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती वगैरे शब्द वापरून मोदींनी भ्रम निर्माण करू नये, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisement -

मोदींकडून यंत्रणांच्या मनमानीस उत्तेजन
पंतप्रधान मोदी यांचे सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्ताने केलेले भाषण भ्रष्टाचार मोडून काढणारे नसून यंत्रणांच्या मनमानीस उत्तेजन देणारे आहे. भाजप तुमच्या पाठीशी आहे, आमच्या विरोधकांना सोडू नका, असा संदेश देणारे आहे. सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणांची प्रतिष्ठा मागील सात-आठ वर्षांत साफ धुळीस मिळाली आहे व त्या यंत्रणांना स्वच्छ करणारे वॉशिंग मशीन अद्यापि निर्माण व्हायचे आहे, असे सांगून ठाकरे गटाने म्हटले आहे.
मोदी यांच्या भाषणांमुळे अदानी वगैरे भाजप मंडळींचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. कारवाया व अटका टाळण्यासाठी भ्रष्टाचारी मंडळी भाजपात प्रवेश करतात याचे मोदींना कौतुक वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न, असा टोला या अग्रलेखातून लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -