घरमहाराष्ट्रसाक्ष उद्धव ठाकरेंच्या उदयाची

साक्ष उद्धव ठाकरेंच्या उदयाची

Subscribe

दोन प्रसंग, दोन घटना

२०१४ सालची विधानसभा निवडणूक. ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपाशी फाटले आणि सक्तीनेच सेनेला स्वबळावर लढावे लागले. त्यातून अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आणि सेनेला खरी आपली शक्ती कळू शकली. त्यानंतर सत्तेसाठी भाजपा व सेना एकत्र आलेले असले, तरी त्यांच्यातली मैत्री आता समान विचारांचा धागा असण्यापेक्षा व्यवहारी तडजोड उरली. कधीही तुटू शकेल अशी ती युती होती. कारण गुण्यागोविंदाने ती युती झालेली नसून, कुरबुरी अखंड चालू होत्या. शिवसेनेच्या पन्नाशीचा समारंभ साजरा करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडायचा मानस नसल्याचे सांगितले आहे. पण तसे बोलण्याची त्यांना गरज भासावी, यातच युती गुण्यागोविंदाने कार्यरत नसल्याची ती कबुली होती. खरी प्रामाणिक युती असती व योग्य सत्तावाटप होऊ शकले असते, तर असे बोलण्याची ठाकरे यांना गरज नव्हती. पण ते बोलले, त्याचे कारण सत्तेतून बाहेर पडण्याचा आग्रह अनेकजण त्यांच्याकडे धरत होते. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की, नालायकांच्या सोबत रहाता कशाला? म्हणजे सत्तेतून बाहेर पडा व भाजपला धडा शिकवा.

तर त्यालाही उद्धवनी हे उत्तर दिले होते. पवारांच्या किंवा अन्य पक्षांच्या सोयीने आपण सत्ता सोडणार नाही, की युतीतून बाहेर पडणार नाही, असेच यातून उद्धव यांनी सुचवले होते. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना पोषक किंवा लाभदायक ठरावे, म्हणून शिवसेना आततायीपणे सत्तेतून बाहेर पडणार नाही. पण म्हणून कितीही अडचण अपमान झाला म्हणूनही सत्तेला चिकटून युतीत रहाणार नाही, असाही इशारा त्यातून भाजपला दिलेला होता. आज नाही, तरी भाजपाला अडचणीचे असेल, तेव्हा आपण युती मोडू शकतो; असेच त्यातून उद्धव ठाकरे सांगत होते. त्याचवेळी आपल्याला अन्य कुणा चाणक्याच्या सल्ल्याची गरज नाही. स्वयंभूपणे आपण निर्णय घेऊ शकतो, असेही त्यांनी स्वपक्षातील मुत्सद्दी शहाण्यांना सांगितले होते. तो इशारा होता भाजपसह अन्य विरोधक राजकीय पक्षातील नेत्यांना. शिवसेनेचे निर्णय मी घेतो हेच उद्धव ठाकरे यांना सुचवायचे होते. असे निर्णय घेण्याची आपल्यात केवळ क्षमताच नाहीतर त्याचे परिणाम स्वीकारण्याची ताकदही आहे, असे उद्धव यांनी सुचित केले होते. ती चुणूक होती, भविष्यात शिवसेनेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार्‍या नेत्याची, त्याच्या क्षमतेची.

- Advertisement -

२६ जानेवारी २०१७, प्रजासत्ताक दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे युती नाही, अशी घोषणा केली. त्यानंतर एकामागून एक राजकीय घडामोडी अशा घडल्या, की बहुतेक राजकीय पक्षांना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची वेळ आली होती. मुंबई कुणाची त्याचे उत्तर प्रत्येक पक्षाने कृतीतून देऊन टाकलेले होते. ते उत्तर म्हणजे मुंबई मराठी आहे आणि त्याचेच प्रतिबिंब प्रत्येक पक्षाच्या उमेदवार यादीत पडलेले होते. शिवसेना नेहमी मराठीच उमेदवार उभे करते आणि बाकीच्या पक्षात मराठी उमेदवार कमी म्हणून बोंब मारली जात असे. त्यावेळी तशी सोय राहिलेली नव्हती. कारण बहुतेक पक्षांनी सर्वाधिक मराठी उमेदवार उभे केले आणि मुंबई मराठी मतांशिवाय जिंकता येत नसल्याचा निर्वाळा दिलेला होता. फार कशाला मराठी मतदार दुखावला तर मुंबईत जिंकायला नको, अशा भयाने सर्वच पक्षांना भेडसावले असल्याची साक्षच त्यांच्या उमेदवार यादीतून मिळालेली होती. कारण प्रत्येकाने सर्वाधिक मराठी उमेदवार उभे केले होते.

युती तोडून उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत तो पहिला विजय संपादन केला. मुंबईत आता मराठी माणसाचा टक्का घसरला आहे आणि मराठी अस्मिता केवळ शिवसेनेची मक्तेदारी नाही, असे गेल्या पन्नास वर्षात अनेकदा म्हटले गेलेले होते. अलिकडे तर मुंबईत मराठी माणसाच्या बळावर निवडणुका जिंकणे अशक्य असल्याचे ठामपणे सांगितले जात होते. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती करून मराठी मतविभागणी टाळण्याचा आग्रहही धरला गेला होता. पण त्या मतविभागणीच्या संकटाला आव्हान देऊनही उद्धव यांनी एकला चालो रे असा पवित्रा घेतल्याने अनेकजण चकीत झालेले होते. खरेतर 2009 च्या विधानसभेत मनसेच्या मतविभागणीने सेना-भाजपला धक्का बसला होता. तेव्हापासून मतविभागणीचा मुद्दा ऐरणीवर आलेला होता. पण आपल्यामुळे मतविभागणी होत असल्याचा साफ इन्कार राज ठाकरे यांनी केला होता. मराठी मतांवर शिवसेनेची मक्तेदारी नाही. इतरही पक्षांना मराठी लोक मते देतात, तेव्हा मतविभागणी होत नाही काय? असा सवाल राजनी जाहिरपणे विचारला होता.

- Advertisement -

तर मनसेनेच मराठी मते विभागल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावेळी तेच दोघे उलट्या भूमिकेत आलेले होते. मतविभागणी नको म्हणून राजनी मातोश्रीवर बाळा नांदगावकर यांना आपला दूत म्हणून धाडले होते. पण मनसेचा युतीचा प्रस्ताव ़फेटाळून लावत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकट्याच्या बळावर सेनेने सर्व जागा लढवण्याचा पवित्रा घेतला. म्हटले तर ते एक धाडस होते, म्हटले तर राजकीय आत्महत्या. पहिल्यांदा महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढताना उद्धव ठाकरे यांचा त्या निवडणुकीत कस लागला होता. त्यावेळी त्यांनी खर्‍या अर्थाने शिवसेनेचा मतदार ओळखला होता. जेव्हा नेत्याला मतदार समजू लागतो तेव्हा तो नेता धोरणी होतो, असे म्हणतात. शिवसेनेने ती निवडणूक जिंकली आणि उद्धव ठाकरेंच्या रुपात राजकारणी पुढे आला.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -