अनोळखी बॅगमुळे ठाणे महापालिका परिसरात उडाला गोंधळ, बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाला केले पाचारण

ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेट नंबर २ समोर कचराळी तलाव जवळ एका बेवारस बॅगेने एकच घबराट पसरली होती. यावेळी बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाच्या मदतीने त्या बॅगेची तपासणी केल्यावर ती रिकामी असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी सर्वच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तसेच बॅग डिलिव्हरी करणाऱ्या एका कंपनीची असल्याचे समोर आले आहे.

महापालिका मुख्यालयात कामकाजाला सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासाने म्हणजे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास, मुख्यालयाच्या गेट क्रमांक २ समोरील झाडाखाली एक बेवारस बॅग आढळून आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे मुख्यालयासह आजूबाजूच्या तसेच कचराळी तलाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, नौपाडा पोलीस, ठाणे नगर पोलीस, बॉम्ब शोधक पथक व श्वान पथक, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली.

बॉम्ब शोधक पथक व श्वानाच्या मदतीने त्या बेवारस बॅगची तपासणी करण्यात आली. त्यानंतर, त्या बॅगेमुळे कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची खात्री पटल्यावर नागरिकांसह महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तसेच,सदरची बॅग ही “फ्रेश टू होम” या कंपनीची डिलिव्हरी बॅग असून ती बॅग नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.


हेही वाचा : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघ होतोय पाणीदार